rhea chakraborty and her brother questioned by ed in sushant singh rajput case | Sarkarnama

#SSRSuicide : रिया चक्रवर्तीसह तिच्या भावाचीही ईडीकडून चौकशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. आता या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला असून, ईडीनेही चौकशीस सुरूवात केली आहे. 
 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. ईडीच्या मुंबईतील कार्यालयात रियासोबत तिया भाऊ शोविक चक्रवर्ती याचीही आज चौकशी करण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) तपास सुरू केला आहे. 

ईडीने या प्रकरणी कर चुकवेगिरीचा गुन्हा दाखला केला आहे. रियाचे चार्टर्ड अकाउंटंट रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चैाकशीही ईडीने केली होती. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

रिया चक्रवर्ताला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावले होते. तिने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित असल्याने त्यावरील सुनावणी होर्पर्यंत चौकशी स्थगित करावी, अशी मागणी केली होती. तिची ही मागणी फेटाळून लावण्यात आली होती. यामुळे आज ती ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती हाही ईडीच्या कार्यालयात आला. या प्रकरणी शोविक हाही आरोपी आहे. त्याचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख