उमेदवार कोणीही असले तरी; खरी लढत जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यातच 

गतवेळी 2014 मध्ये हातातोंडाशी आलेला घास या वेळी निसटणार नाही, अशी व्यूहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे.
उमेदवार कोणीही असले तरी; खरी लढत जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यातच 
The real battle in the Pune graduate constituency will be between Jayant Patil and Chandrakant Patil

पिंपरी : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससुद्धा सांगलीचाच उमेदवार देणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. गतवेळचे बंडखोर अरुण लाड यांना या वेळी अधिकृत उमेदवारी देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने "सरकारनामा'ला सांगितले. तसे झाले तर ही लढत मोठी रंगतदार होईल. पक्षाचे उमेदवार आज जाहीर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे पक्षाची बंडखोरीची चिंताही मिटणार आहे. परिणामी गतवेळी 2014 मध्ये हातातोंडाशी आलेला घास या वेळी निसटणार नाही, अशी व्यूहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. त्यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील हे अवघ्या 2380 एवढ्या निसटत्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. तर अपक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर असलेल्या लाड यांनी 37 हजार 189 मते घेतली होती. चंद्रकांत पाटील यांना 61 हजार 453, तर राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सारंग पाटील यांना 59 हजार 073 मते मिळाली होती. 

गतवेळची लढत ही दोन पाटलांमध्येच (भाजपचे चंद्रकांतदादा पाटील आणि राष्ट्रवादीचे सारंग पाटील) झाली होती. या वेळी हे दोन्ही पाटील उमेदवार नाहीत. कारण, चंद्रकांत पाटील हे गेल्या वर्षी कोथरुडमधून विधानसभेला विजयी झाले आहेत. तर त्याच वर्षी सारंग पाटील यांचे पिताश्री श्रीनिवास पाटील हे लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होऊ नये; म्हणून सारंग पाटील यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे या पूर्वीच जाहीर करून टाकलेले आहे. 

या वेळची पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दोन पाटलांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण, चंद्रकांत पाटील हे गतवेळचे या मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते. सध्या चंद्रकांत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना ही जागा टिकवावीच लागणार आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ती वाढवायची आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या जवळचे आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या गावापासून जेमतेम वीस किलोमीटरवर दूर असलेल्या लाडांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे.

लाड यांचे संघटन कौशल्य, गेल्या वेळचा निवडणुकीचा अनुभव, त्यामुळे तयार असलेले नेटवर्क, जिल्हा परिषदेत पक्षाचे गटनेते असलेले त्यांचे चिरंजीव शरद, कारखान्याची ताकद या जमेच्या बाबी पक्षाने उमेदवारीसाठी जमेस धरल्याचे कळते. एकूणच उमेदवार कोणीही असो, पुणे पदवीधर मतदारसंघात चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील या दोन पाटलांचाच कस लागणार आहे, हे मात्र निश्‍चित. 

Related Stories

No stories found.