बीड जिल्ह्यात पावसाचे थैमान : पुढील चार दिवस महत्वाचे
pur.jpg

बीड जिल्ह्यात पावसाचे थैमान : पुढील चार दिवस महत्वाचे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला हाय अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बीड : राज्याभरात गेली आठवड्याभरापासून पावसाने थैमान घातले आहे. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला हाय अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने आणखी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले, की काही ठिकाणी मानवी व वित्त हानी झाल्याचेही विविध वृत्त येत आहेत. याबाबत प्रशासन स्तरावर माहिती घेत असून तातडीने आवश्यक तिथे मदत पोहोच करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत वॉर रूम व फोन-इन मदत केंद्र सुरू करावे व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना तातडीने सक्रिय करून हाय अलर्ट मोड व ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा...

जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या संततधार पावसाने नद्या-तलाव ओसंडून वाहत असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी रस्ते-पूल वाहून गेले आहेत. या अनुषंगाने तुटलेले, वाहून गेलेले पूल, रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावे व अत्यावश्यक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत अशाही सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. 

जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील तहसीलदारांनी पूर्णवेळ सतर्क राहून दर तासाला जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना दर तासाला आपापल्या तालुक्यातील नुकसान व अन्य बाबींचे अपडेट्स द्यावेत व आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश धनंजय मुंडेंनी दिले आहेत. 

काल (सोमवारी) जिल्ह्यात विविध दुर्घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजही दोन ते तीन व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील नदी व तलावाच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी वाहत्या नद्या, तलाव, जलाशय आदी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. याचाच विचार करून जिल्ह्यातील पूर परिस्थिती आटोक्यात येताच, शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नुकसानीचे पूर्ण पंचनामे व अन्य सर्व प्रकारची मदत देण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येतील, सर्व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या सर्वात महत्वाचा असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.