पुणे पदवीधरचा निकाल पालिका निवडणुकीसाठी सूचक
PCMC Building - Arun Lad

पुणे पदवीधरचा निकाल पालिका निवडणुकीसाठी सूचक

विधानपरिषद निवडणुकीच्या या निकालातून सव्वा वर्षावर आलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपला सूचक इशारा गेल्याचे मानले जात आहे. तर, बालेकिल्यातील महापालिकेची २०१७ ला गेलेली सत्ता २०२२ ला पुन्हा परत खेचण्यासाठी या निकालाने राष्ट्रवादीला बळ दिले आहे

पिंपरी: पिंपरी चिंचवडसारख्या शहरी भागात तुलनेने कमी झालेल्या मतदानामुळे भाजपचा पुणे पदवीधर मतदारसंघात पराभवच झाला नाही, तर राष्ट्रवादीचा अरुणोदयही झाला आहे. या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा नाही, तर या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा पराभव असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या या निकालातून सव्वा वर्षावर आलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपला सूचक इशारा गेल्याचे मानले जात आहे. तर, बालेकिल्यातील महापालिकेची २०१७ ला गेलेली सत्ता २०२२ ला पुन्हा परत खेचण्यासाठी या निकालाने राष्ट्रवादीला बळ दिले आहे. राष्ट्रवादीसह आघाडीला १४ महिन्यावर येऊन ठेपलेल्या या महापालिका निवडणुकीसाठी हा निकाल बूस्टर डोस ठरणार आहे.  

नागपूरनंतर पुणे पदवीधर हा सुद्धा भाजपचा अभेद्य गड होता.मात्र,पिंपरी चिंचवड या अभेद्य गडातील राष्ट्रवादीची सत्ता अतिआत्मविश्वासाने २०१७ ला या पक्षाला जशी गमवावी लागली होती.,तसेच भाजपचं पुणे पदवीधरमध्ये झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हा पराभव त्यांच्यासाठी मानहानीकारकही आहे.कारण,ही त्यांच्या प्रदेशाध्यक्षांची जागा होती.तेथून ते सलग दोनदा निवडून आले होते. यावेळी त्यांना हँटट्रिक साधायची होती.

मतदारसंघाच्या ग्रामीण भागात अधिक मतदान झाल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाल्याची बातमी मतमोजणीच्या दिवशी 'सरकारनामा'ने दिली होती. ती तंतोतंत खरी ठरली.त्यातून ग्रामीण भागात अधिक मतदान झाले, तर त्याचा फायदा काँग्रेसला (मग ती कोणतीही काँग्रेस असेना)आणि तोटा भाजपला होतो,हे अधोरेखित झाले. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कमी मतदानाने राष्ट्रवादीचा विजय आणखी मोठा झाला. शहरात झालेल्या २९ टक्के मतदानापैकी निम्मे भाजपला होईल हा पक्षाचे शहर निरीक्षक आमदार निरंजन डावखरेंचा अंदाजही चुकला. शहरातील सत्ताधारी भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे. आता,तरी रेटून कारभार करु नका, असा सूचक इशारा या निकालाने शहर कारभारी आमदारांना दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.