मुलीला तिकीट नाकारलं अन् मोदींच्या भावानं अमित शहांकडे दाखवलं बोट - PM Narendra Modis brother Pralhad Modi slams Bjp leaders over new ticket rules | Politics Marathi News - Sarkarnama

मुलीला तिकीट नाकारलं अन् मोदींच्या भावानं अमित शहांकडे दाखवलं बोट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीत मुलीला तिकीट नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे.

अहमदाबाद : अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीत मुलीला तिकीट नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांचे क्रिकेटमध्ये कोणतेही योगदान नसताना कशाच्या आधारे त्यांना बीबीसीचे सचिव करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी व प्रल्हाद मोदी यांची मुलगी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपकडं तिकीट मागितले होतं. पण पक्षाने प्रसिध्द केलेल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून त्या पक्षामध्ये सक्रीय आहेत. सोनल यांना उमेदवारांसाठीच्या नवीन नियमांमुळे तिकीट नाकारण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गुजरात भाजपने पक्षातील नातेवाईकांचा विचार उमेदवारीसाठी केला जाणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. हाच नियम सोनल यांनाही लावण्यात आला आहे. तसेच तीन वेळा नगरसेवक असलेले आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देणार नसल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. या नवीन नियमांवर प्रल्हाद मोदी यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे.

प्रल्हाद मोदी यांनी थेट पक्षातील नेत्यांकडे बोट दाखवत सांगितले की, पक्षाने बनविलेले नियम देशातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नेत्यांनाही लागू होतो. पण केंद्रीय राजनाथ सिंह यांचा आणि मध्य प्रदेशमधील कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार बनू शकतो. गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा बीबीसीचे सचिव बनतात. त्यांनी क्रिकेटमध्ये कोणतेही महत्वाचे योगदान दिलेले नाही. तसेच या क्षेत्रात त्यांचे कोणतेही काम नाही. ते सरकारसाठी उपयोगी असल्याची कोणती पदवी त्यांच्याकडे आहे का?, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.

जय शहा बीबीसीचे सचिव बनत असतील तर पक्ष दोन समांतर पातळीवर काम करत असल्याचे दिसते. जे त्यांच्या ऐकतात त्यांनाच पदांवर ठेवले जाते, हे स्पष्टपणे दिसते. माझी मुलगी जर तिने केलेल्या कामाच्या जोरावर जिंकू शकत असेल तर तिला तिकीट द्यायला हवे. ती पंतप्रधान मोदींची पुतणी आहे म्हणून तिकीट नको. मला आणि माझ्या मुलीला पंतप्रधान मोदींचे नातेवाईक असल्याचे कोणतेही फायदे नकोत, असेही प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख