आमदार महेश लांडगेंना पोलिसांची नोटीस

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपुजनानिमित्त आयोजित करण्यात आलेला लाडू वाटपाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी नोटीस पिंपरी पोलिसांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांना बजावली आहे.
आमदार महेश लांडगेंना पोलिसांची नोटीस
Pimpri Police Served Notice to MLA Mahesh Landge

पिंपरी : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपुजनानिमित्त आयोजित करण्यात आलेला लाडू वाटपाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी नोटीस पिंपरी पोलिसांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांना बजावली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटपाचा कार्यक्रम करणे योग्य ठरणार नाही. तरी आपण सदरचा लाडू वाटपाचा कार्यक्रम करु नये, या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे पोलिसांनी या नोटिशीत म्हटले आहे. अयोध्येतल्या राममंदिराच्या भूमीपुजनाच्या निमित्ताने लांडगे यांनी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान, अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होत असताना त्यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींमार्फत वेगवेगळ्या प्रकारे धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही ठिकाणी एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील समारंभाचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. भाजपाच्या मुंबईतील सर्व कार्यालयांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. तर अनेक चौकात श्रीरामाच्या प्रतिमांचे पूजन करून लाडू, पेढे व मिठाई वाटण्यात येईल. भाजपच्या दादर येथील शहर मुख्यालयात मंगळवारी संध्याकाळी गीतरामायणाचा कार्यक्रम होईल.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारसेवकांचा सत्कारही करतील. तर शहर अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील बाणगंगा या प्राचीन मंदिरात दीपोत्सव आयोजित केला आहे. बुधवारी गिरगावातील प्रत्येक मंदिरात दीपोत्सव होईल तर सर्वत्र भगवे ध्वज लावले जातील.

बोरीवलीत घंटानाद
उत्तर मुंबईत बोरीवलीचे आमदार सुनील राणे, कांदीवली (पूर्व) चे आमदार अतुल भातखळकर, चारकोपचे आमदार योगेश सागर हे स्वतः घंटानाद, पूजा आदी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तेथील सर्व नगरसेवक कार्यालये दिव्यांनी सजविण्यात येणार आहेत. त्याखेरीज दिव्यांची आरास, आरत्या, मंदिरांवर पुष्पवर्षाव होईल.

पुण्यातही कार्यक्रम
अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमि स्थानी उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे. ह्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज सकाळी १०.३० वाजता जंगली महाराज रस्त्यावरील पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in