चारनंतर भाजी विकणारे आयुक्तांचे नातेवाईक आहेत का?  

सध्या शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.
चारनंतर भाजी विकणारे आयुक्तांचे नातेवाईक आहेत का?  
Pimpri Chinchwad is not relieved by the corona restriction .jpg

पिंपरी : राज्यातील २१ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करताना महाविकास आघाडी सरकारने पुण्यासह ११ जिल्हयात मात्र, ते नुकतेच कायम ठेवले आहेत. त्याविरोधात एल्गार पुकारीत पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) भाजपच्या (Bjp) महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी शहरातील दुकाने रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्यास हरकत नसल्याचे सांगत तशी मागणी बुधवारी (ता.४) केली. सायंकाळी चार वाजता दुकाने बंद आणि भाजीविक्री त्यानंतरही सुरु राहत असल्याने ते विकणारे पालिका आयुक्तांचे नातेवाईक आहेत, अशी विचारणा महापौरांनी केली. (Pimpri Chinchwad is not relieved by the corona restriction) 

सध्या शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ रात्री नऊपर्यंत केली, तर गर्दी होणार नाही. तसेच सायंकाळी कामावरून येणाऱ्या चाकरमान्यांचीही कुचंबणा होणार नाही, असे महापौर म्हणाल्या. त्यामुळे रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास हरकत नसून तशी परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली. त्यावर उद्या निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांनी परवानगी नाकारली, तरी उद्यापासून दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवली जाणार आहेत, असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशन या दुकानदारांच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीचद असवानी यांनी दिला आहे.

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील व्यापारीही आक्रमक झाले आहेत. दुकानांची वेळ वाढवून मिळण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज घंटानाद केला. तर, पिंपरीतील व्यापाऱ्यांनी त्यासाठी उद्यापर्यंतची मुदत (अल्टीमेटम) आयुक्तांना दिली आहे. त्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने इशारेवजा निवेदन आज आयुक्तांना दिले. नंतर त्यांनी आयुक्त, महापौर व स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्याबरोबर चर्चा  केली. पॉझीटीव्हीटी रेट शहरात पाच टक्याखाली आल्याने निर्बंधात बाकीच्या जिल्ह्यांसारखी सूट मिळण्य़ाची मागणी व्यापारी प्रतिनिधींनी केली. 

तसेच आमची दुकाने चार वाजता बंद झाली नाही, तर दंड केला जातो, मात्र भाजीविक्री त्यानंतर सुरु राहते, अशी तक्रार त्यांनी महापौरांकडे केली. त्यावर आपल्याकडेही अशा तक्रारी आल्याचे सांगत भाजीविक्रेते काय आयुक्तांचे नातेवाईक आहेत का अशी संतप्त विचारणा महापौरांनी केली. व्यापाऱ्यांना दंड करणारे तुमचे कर्मचारी श्रीमंत आहेत, असे त्या आयुक्तांना म्हणाल्या. 

शहरातील कोरोनाचा पॉझीटीव्हीटी रेट साडेतीन टक्यावर आल्याने व्यापाऱ्यांची निर्बंध शिथिल करण्याची मागणी रास्त आहे, असे महापौर म्हणाल्या. तसेच दुकाने रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, कोरोना रुग्णबाधितांचा टक्का पाच टक्याखाली आल्याने सायंकाळी सातपर्यंत, जरी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली, तरी व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असे स्थायी समिती अध्यक्षही म्हणाले.  

Related Stories

No stories found.