तीन हजार डॅाक्टरांनी एकाचवेळी दिला राजीनामा; सरकारच्या अडचणीत वाढ

आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांना डॅाक्टरांच्या घरी पाठवण्यात आले होते.
तीन हजार डॅाक्टरांनी एकाचवेळी दिला राजीनामा; सरकारच्या अडचणीत वाढ
Over 3000 junior doctors resign in Madhya pradesh

भोपाळ : विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून संपावर असलेल्या सुमारे तीन हजार डॅाक्टरांनी एकाचवेळी राजीनामा दिला आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर डॅाक्टरांनी हे पाऊल उचललं आहे. तसेच या आदेशाला आव्हान देण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोना (Covid-19) काळात सरकारी रुग्णालयांतील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Over 3000 junior doctors resign in Madhya pradesh)

मध्य प्रदेश ज्युनिअर डॅाक्टर्स असोसिएशन (MPJDA)ने सोमवारपासून संप पुकारला होता. मानधनात वाढ करणे, मोफत उपचार अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या सचिव अंकित त्रिपाठी म्हणाल्या, सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. केवळ आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन संप मागे घेणार नाही. जवळपास तीन हजार डॅाक्टरांनी राजीनामा दिला आहे. 

आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांना डॅाक्टरांच्या घरी पाठवण्यात आले होते. डॅाक्टर सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सरकारने केला आहे. हे खरे नाही. जर आम्ही सरकारला ब्लॅकमेल करत असू तर मग एवढे कमी रुग्ण कसे झाले?, असा सवाल त्रिपाठी यांनी उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी मात्र डॅाक्टरांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले. तसेच मागण्या मान्य करून ते त्यांचा हट्ट सोडायला तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

संघटनेचे अरविंद मीना यांनीही सरकारला धारेवर धरले. सरकारने आम्हाला मानधनात 24 टक्के वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही वाढ होईपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मध्य प्रदेशलाही बसला आहे. रुग्णांना बेड मिळणेही कठीण होते. पण आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असले तरी अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये ज्युनिअर डॅाक्टरांवर मोठा ताण आहे. आता या डॅाक्टरांनीच राजीनामे दिल्याने सरकारी रुग्णालयांतील अन्य यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in