कोरोना इफेक्ट : या पोलिस आय़ुक्तालयात या तीन दिवसांत एकही गुन्हा नोंद झाला नाही

कोरोनाच्या संचारबंदीत पोलिस रस्त्यांवर दिसत असल्याचा धसका गुन्हेगारांनीही घेतला आहे....
कोरोना इफेक्ट : या पोलिस आय़ुक्तालयात या तीन दिवसांत एकही गुन्हा नोंद झाला नाही
pcmc police

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी लॉकडाउन कालावधीतील "ते' तीन दिवस ऐतिहासिक ठरले आहेत. या तीन दिवशी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. आयुक्तालय कार्यान्वीत झाल्यापासून स्टेशन डायरी निरंक राहण्याचा असा प्रसंग तीन वेळा घडला आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्रच लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शहरातील गुन्ह्यांचेही प्रमाण घटले आहे. अशातच 22 मार्चला पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यूच्या दिवशी तसेच 20 एप्रिल व 2 मे या दिवशी तर आयुक्तालयाच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. कोरोनाची सामान्य नागरिकांसह गुन्हेगारांनी घेतलेली धास्ती तसेच संचारबंदीमुळे पावलोपावली उभे असलेले पोलिस यामुळे हा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. 

आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, वाकड सांगवी, हिंजवडी, दिघी, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी या 15 पोलिस ठाण्यांमध्ये दररोज प्रत्येकी किमान दोन-तीन गुन्ह्यांची नोंद होते. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लैंगिक अत्याचार, विनयभंग, चोऱ्या आदी गुन्ह्यांचा समावेश असायचा. मात्र, 22 मार्चला जनता कर्फ्यू पुकारल्यानंतर लगेचच सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आले. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांसह रस्त्यांवर नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी केली जात आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडे चौकशी केली जात असल्याने गुन्हेगारही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे पोलिसांचा धाक असल्याने गुन्हेगारी घटना कमी झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

पुर्वी सर्व पोलिस ठाणे मिळून दरदिवशी किमान 30 ते 35 असे गुन्हे दाखल होण्याचे असलेले प्रमाण आता केवळ सहा ते सात गुन्ह्यांवर आले आहे. यातच 22 मार्च, 20 एप्रिल व 2 मे या दिवशी तर एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. 
सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होत असलेल्या कारवाई व्यतिरिक्त इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याने पोलिसांवरीलही कामाचा काहीसा भार हलका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in