महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही...  - no presidential reign in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले जात असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. तर, ज्यावेळी गोध्रा हत्याकांड झाले, त्यावेळी कॉंग्रेसने राष्ट्रपती राजवट लागू केली नव्हती. राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि कधी नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये लिहून ठेवले आहे. 

कोल्हापूर: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर आता सचिन वाझे प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले जात असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. तर, ज्यावेळी गोध्रा हत्याकांड झाले, त्यावेळी कॉंग्रेसने राष्ट्रपती राजवट लागू केली नव्हती. राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि कधी नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये लिहून ठेवले आहे. 

त्यामुळे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकत नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ म्हणाले, भाजपकडून चुकीच्या कारणावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाविकास आघाडी भक्कम आहे. अशा चुकीच्या आरोपांमुळे आणि टीकेमुळे सरकारची अडचण होणार नाही. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी अनेक मंत्री व आमदार क्वारंटाईन होते. त्यामुळे निवडणूक घेता आली; पण भविष्यात निश्‍चितपणे विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. यामध्ये महाविकास आघाडीसोबत 170 मते आहेत. निवडणुकीवेळी 180 मते असतील, असा टोलाही मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

दरम्यान, मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली तसेच उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटके कुणी ठेवली याचा शोध लागणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, त्यावर काही बोलण्यापेक्षा केवळ राष्ट्रपती राजवट लावण्याची विरोधकांना घाई आहे. मुळात यांची मजल राष्ट्रपती राजवटीपलीकडे नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल केली होती. 

पोलिस आधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि केंद्राला अहवाल देऊन ‘सीबीआय’ चौकशीची केलेली मागणी केवळ विषय चर्चेत राहण्यासाठी केलेली आहे. त्या अहवालात विशेष नाही. त्या काळात केलेल्या सर्व बदल्या नियमाप्रमाणेच आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षात चर्चा होऊनच बदल्या नियमाप्रमाणे झाल्या आहेत, असेही पाटील यांनी बुधवारी नमूद केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख