आढळरावांच्या सात वर्षांच्या 'या' लढ्याला अखेर मिळाले यश!

पुणे नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते मोशी टोल नाका या १७ किलोमीटर लांबीच्या ६५० कोटी रकमेच्या कामास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली
आढळरावांच्या सात वर्षांच्या 'या' लढ्याला अखेर मिळाले यश!
Shivajirao Adhalrao

चाकण :पुणे नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते मोशी टोल नाका या १७ किलोमीटर लांबीच्या ६५० कोटी रकमेच्या कामास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. या मंजुरी मुळे गेल्या सात वर्षाच्या लढ्याला,पाठपुराव्याला यश आले आहे.

याबाबत माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, "नाशिकफाटा ते खेड महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी मी २०१३ पासून पाठपुरावा सुरु केला होता.  तत्कालीन मंत्री सी.पी. जोशी यांची सर्वप्रथम नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. २०१४मध्ये येथील शासन केंद्रात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन पुणे व नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे महत्व विषद केले होते,''

'' येथील चाकण व भोसरी एमआयडीसीसह दैनंदिन मोठ्या प्रमाणाची वाहतूक पाहता भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मला आश्वासन दिले. त्यादृष्टीने प्रकल्पाचा सविस्तर अहवाल बनविण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. 
या प्रकल्पाचा डीपीआर बनविताना २०१५ ते २०१६ या दोन्ही वर्षात मी राष्ट्रीय महामार्गाचे सचिव, प्रकल्प संचालक, डीपीआर बनवणारी सल्लागार कंपनी, पुणे जिल्हाधिकारी, भूसंपादन विभागाचे अधिकारी आदीं समवेत सातत्याने पाठपुरावा व बैठका घेऊन प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या,'' असेही आढळराव म्हणाले..

''या प्रयत्नांना यश मिळून जानेवारी २०१६ मध्ये २९ किलोमीटर लांबीच्या नाशिक फाटा ते खेड महामार्गाच्या सहापदरीकरण कामाचा डीपीआर अंतिम करून मंजुरी दिल्याने व भूसंपादनास सुरुवात करीत असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मला पत्राद्वारे कळविले. त्यानुसार सदर कामाची १०१३ कोटींच्या निविदा प्रक्रिया डिसेंबर २०१७ मध्ये राबविण्यात आली. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिका हद्दीतील मोशी ते नाशिक फाटा या महामार्गावरील डीपीआर ला हरकत घेतल्याने त्यावेळी निविदा प्रक्रिया थांबवावी लागली होती. त्यानंतर संपूर्ण महामार्गाचा नव्याने डीपीआर करण्यास सुमारे एक वर्षाचा कालावधी लोटला. अन्यथा एव्हाना या महामार्गाचे काम बऱ्याच अंशी पूर्णत्वास आले असते,'' अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ''रस्त्याची रुंदी ६० मीटर निश्चित करण्यात आली होती. मात्र या महामार्गावरील भूसंपादनातील वाढत्या अडचणी लक्षात घेता ४५ मीटर महामार्गाची रुंदी असणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड ठेवण्यात आला असून चाकण या ठिकाणी २.२५ किमी लांबीचा मोठा उड्डाणपूल तसेच ७ व्हेईकल अंडरपास व २ ठिकाणी ओव्हरपास करण्यात येणार आहे,''

नाशिक फाटा ते मोशी डीपी प्लॅनमध्ये महापालिकेने काही सूचना दिल्याने व भूसंपादनात काही पर्याय सुचविल्याने या भागाचे रुंदीकरण दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. मोशी टोल नाका ते खेड टोल नाका हा रस्ता सहापदरीकरण व्हावा अशी येथील नागरिकांची व प्रवाशांची मागणी चार-पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पूर्ण करण्यास यश मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.