राष्ट्रवादीचा नेता पळविण्यासाठी रामदास कदम खास मुंबईहून आले...

वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नाहीत.
राष्ट्रवादीचा नेता पळविण्यासाठी रामदास कदम खास मुंबईहून आले...
NCP's Khed city president Satish Chikane joins Shiv Sena

खेड (जि. रत्नागिरी) : वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड शहराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी पक्ष सदस्यत्वासह शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, दुपारी अडीच वाजता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशासाठी कदम खास मुंबईहून खेडला आले होते. आमदार योगेश कदम यांनी चिकणेंच्या हाती शिवबंधन बांधले. (NCP's Khed city president Satish Chikane joins Shiv Sena)

त्यानंतर चिकणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी राष्ट्रवादीचे काम पक्ष स्थापनेपासून करत होतो. गेल्या चार वर्षांपासून माझ्याकडे पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. परंतु गेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून आघाडी झाली. तेव्हापासून मला शहराध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी व नेते काम करू देत नव्हते.

गेल्या दीड वर्षापासून पक्षात शहरातील राजकारणात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करून घेतले जात नसून माझी गळचेपी सुरू आहे. त्यामुळे हे शहराध्यक्षपदाचा शोभेचा मुकुट मला आता नको, असे मी पक्षश्रेष्ठींना सांगूनदेखील त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे मी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे चिकणे म्हणाले.

खेड शहरात राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते वाढवत आहेत, असा समज पसरवला जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य व जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांचा विचार न करता कोणतीच पावले खेड शहरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नेत्यांकडून उचलली जात नाहीत. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही चिकणे यांनी नमूद केले.

दरम्यान, आमदार कदम म्हणाले, ‘‘चिकणे यांच्या मदतीने मी खेड शहर व मतदारसंघात विकासकामे करण्यात गती घेईन. आम्ही दोघे भाऊभाऊ म्हणून मतदार संघाचा विकास करू. खेडच्या विकासासाठी लागेल, ती मदत चिकणे यांना दिली जाईल.’’ या वेळी राष्ट्रवादीचे शहर सचिव तुषार सापटे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in