जयंत पाटलांना कोल्हापूरला निघावे लागले अन्‌ राष्ट्रवादीतील प्रवेश रखडले

हा दौरा आटोपता घेत कोल्हापूरच्या दिशेने तातडीने प्रयाण केले.
 जयंत पाटलांना कोल्हापूरला निघावे लागले अन्‌ राष्ट्रवादीतील प्रवेश रखडले
NCP will return to power in Pimpri-Chinchwad : Jayant Pati

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने नेत्रदीपक विकास केला असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत पुन्हा यश संपादन करेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी  (ता.२३) चिंचवडमध्ये व्यक्त केला. दरम्यान, सांगली, कोल्हापूरची पूरस्थिती बिकट झाल्याचे समजताच त्यांनी आपला हा दौरा आटोपता घेत कोल्हापूरच्या दिशेने तातडीने प्रयाण केले. त्यामुळे राष्ट्रवादीत आज होणारे प्रवेश लांबणीवर पडले आहेत. (NCP will return to power in Pimpri-Chinchwad : Jayant Patil)

वंचित आघाडी तसेच रिपब्लिकन पक्षातील वीसेकजणांचा राष्ट्रवादीत आज प्रवेश होणार होता, असे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. मात्र, ते होण्यापूर्वीच दौरा अर्धवट सोडून जलसंपदा मंत्री कोल्हापूरला रवाना झाल्याने हे इनकमिंग पुन्हा काही दिवसांसाठी लांबणीवर पडले आहे. भाजपमधील काही मोठे मासेही राष्ट्रवादीच्या गळाला लागलेले असून त्यांचे इनकमिंगही हळूहळू होणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. भाजपच्या ओबीसी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सारिका पवार यांनी याअगोदरच राष्ट्रवादीतील प्रवेशाचे खाते उघडलेले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयोजित कष्टकरी कामगार संवाद कार्यक्रमासाठी पाटील शहरात आले होते. कामगारनगरी पिंपरी चिंचवडमधील कष्टकरी कामगारांना कष्टकरी संघर्ष महासंघ न्याय हक्क मिळवून देत आहे, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. त्यामुळे राष्ट्रवादीही पाठीशी राहून कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेईल, असे ते म्हणाले. 

आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, गायक आनंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, कामगार नेते काशिनाथ नखाते, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबालकर, नगरसेविका मंगला कदम आदी या वेळी उपस्थित होते. 

कष्टकरी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी नखाते यांनी या वेळी पाटील यांच्याकडे केली. चार घास सुखाचे अन्न वितरण योजनेचा एक लाख सत्तर हजारहून अधिक कष्टकऱ्यांना लाभ दिल्याबद्दल महासंघाचे मंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते कष्टकऱ्यांना राज्य सरकारच्या कोरोनाच्या आर्थिक मदतीचे वाटप या वेळी करण्यात आले.

नाना पटोलेंची पिंपरी भेट रद्द

दरम्यान, राज्यातील व त्यातही सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील (रायगड) पूरस्थितीमुळे आता अनेक नेते तिकडे धाव घेऊ लागले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे  आजच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. उद्या ते पुण्यातूनच विमानाने नागपूरला जाणार होते. मात्र, पूरस्थितीमुळे त्यांनीही आपला दौरा आटोपता घेतला आणि ते पुण्यातूनच दुपारी साताऱ्याला रवाना झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची होणारी पहिलीच पिंपरी-चिंचवड भेट पावसामुळे हुकली. त्यामुळे शहरातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. त्यांना आपल्या नेत्याकडून बूस्टर डोसची अपेक्षा होती. शहरात तोळामासा प्रकृती झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर ते रात्री उशीरा बैठक घेणार होते. तसेच, शहरातील उद्योजकांशीची ते चर्चा करणार होते.

Related Stories

No stories found.