राष्ट्रवादीच्या आमदारास शिवागीळ करून सुरक्षा रक्षकास मारहाण

ही घटना घडली, तेव्हा आमदार निवास स्थानी नव्हते.
राष्ट्रवादीच्या आमदारास शिवागीळ करून सुरक्षा रक्षकास मारहाण
NCP MLA Atul Benke's security guard beaten by five people

नारायणगाव (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना शिवीगाळ करून त्यांच्या निवास स्थानाचे सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २० एप्रिल) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी पाच जणांवर बुधवारी (ता. २१ एप्रिल) दुपारी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा रात्री आमदार अतुल बेनके हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जुन्नर मतदारसंघातील गावोगावी फिरत होते. त्यामुळे ते निवास स्थानी नव्हते. 

आमदार बेनके यांच्या निवास स्थानी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे खंडेराव पिराजी पानसरे (वय ३५, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांना पाच जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्या प्रकरणी कपिल कानसकर (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) व अन्य चार अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आमदार बेनके यांच्या निवास स्थानी खंडेराव पानसरे हे गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत काम पहातात. कपिल कानसकर व अन्य चार जण मंगळवारी (ता. २० एप्रिल) रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आमदार बेनके यांच्या निवासस्थानी आले. ‘कुठे आहे तुझा आमदार,’ असे म्हणून त्यांनी आमदार बेनके यांना शिवीगाळ केली. 

या वेळी सुरक्षारक्षक पानसरे यांनी त्यांना निवास स्थानात जाण्यास प्रतिबंध केला. या मुळे संतापलेल्या कानसकर व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य व्यक्तींनी पानसरे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील दोनशे रुपये काढून घेतले, असे सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी सांगितले. 

या वेळी पानसरे यांनी आरडाओरडा केल्याने कानसकर व अन्य व्यक्ती निघून गेल्या. त्या नंतर आज सकाळी पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कानसकर व अनोळखी चार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरारी झाल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : तुम्ही इंदापूरचे लोकप्रतिनिधी असला तरी सोलापूरचे पालकमंत्री असल्याचे भान ठेवा

सोलापूर : कोविड लशीचा सोलापूरचा वाटा कमी करून तो पुण्याकडे वळविला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला. तसेच, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे प्रतिनिधित्व करत असले तरी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोलाही त्यांनी भरणे यांना लगावला आहे. 

सोलापूर शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावसंदर्भात बुधवारी (ता. 21 एप्रिल) महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये शहरातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यात आला. 

देशमुख म्हणाले की, सोलापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून नेटाचे प्रयत्न केले जात आहेत. पण अशा कठिण परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन असो, की लसीकरणासाठी डोस देताना सोलापूर शहर-जिल्ह्याचा वाटा कमी करून तो पुण्याकडे वळविला जात आहे. मागील चाळीस वर्षापासून पुणेकरांकडून सोलापूर जिल्ह्याला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे, असा आरोपही या वेळी आमदार देशमुख यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in