नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर 

न्यायालयाने राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावण्याचा आदेश दिला होता.
नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर 
Narayan Rane .jpg

अलिबाग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आज ता. (१३ सप्टेंबर) दुपारी अलिबाग जिल्हा पोलिस कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे याच्या समोर हजर राहणार आहेत. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याच्यांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होते, मात्र, ते दिल्लीला गेले होते. राणे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महाडच्या गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले होते. (Narayan Rane will appear before Alibag police today) 

मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन दिला होता. न्यायालयाने राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी ३० ऑगस्ट रोजी हजेरी लावली नव्हती. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यलयाला छावणीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे 200 मीटर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नारायण राणे हे साधारण एक वाजण्याच्या सुमारास हजर राहणार आहेत. यावेळी पत्रकारांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यलयात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात वाद निर्माण झाला होता. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. नारायण राणे मुंबई येथून अलिबागला दाखल होणार आहेत. पोलिसांसमोर ते हजेरी लावणार आहेत. अशी माहिती नारायण राणे याचे वकील अॅड. संदेश चिकणे यांनी दिली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in