खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितला रेमडेसिव्हिरला पर्याय; ही दोन औषधे वापरण्याचा सल्ला
MP Dr. Amol Kolhe said the alternative to Remedesivir; Advise to use these two drugs

खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितला रेमडेसिव्हिरला पर्याय; ही दोन औषधे वापरण्याचा सल्ला

रेमडेसिव्हिर इंजेक्शन जीवनरक्षक नसले तरी, याचा उपयोग शरीरातील विषाणूची संख्या कमी होण्यासाठी होतो, ही बाब खरी आहे.

लोणी काळभोर (जि. पुणे) : रेमडेसिव्हिर इंजेक्शन शंभर टक्के जीवनरक्षक औषध नसल्याचे कोविड टास्क फोर्सने यापूर्वीच जाहीर केले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनप्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लू ही दोन्ही औषधे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करतात. यामुळे कोरोना रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर या दोघांनीही पॅनिक न होता या दोन औषधांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

दरम्यान, रेमडेसिव्हिर इंजेक्शन शंभर टक्के जीवनरक्षक नसले तरी डॉक्टर व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून या रेमडेसिव्हीर इंजेक्शनला मोठी मागणी होत आहे. त्यामुळे या पुढील काळात या इंजेक्सनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारकडून युध्दपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यामुळे डॉक्टरांनी सध्यातरी गरजू रुग्णांनाच फक्त रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यावे, अशी विनंती आहे. तसेच, पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, या भागातील विविध रुग्णालयांत पुरेसे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार कोल्हे यांनी दिली. 

खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी शनिवारी (ता. १७ एप्रिल) सकाळी लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. पूर्व हवेलीमधील कोरोना रुग्ण व रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी वरील आवाहन केले.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, लोणी काळभोर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले, रेमडेसिव्हिर इंजेक्शन जीवनरक्षक नसले तरी, याचा उपयोग शरीरातील विषाणूची संख्या कमी होण्यासाठी होतो, ही बाब खरी आहे. यामुळे सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झालं नाही, तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध म्हणून फेव्ही पॅरावीर अथवा फॅबी फ्लू सुचविले आहे. यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन वापराबाबत पूर्ण विचार करण्याची गरज आहे. सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी युद्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरुळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देण्याची गरज आहे. नागरिकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. 

हडपसर, पूर्व हवेलीसाठी जंबो कोविड सेंटर सुरू करण्याची सरकारकडे मागणी 

खासदार कोल्हे म्हणाले, हडपसर व पूर्व हवेलीत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. येथील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन या भागातील विविध रुग्णालयांत पुरेसे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध कसे करुन देता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.  पूर्व हवेली आणि हडपसर परीसरातील रुग्णांसाठी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरमध्ये पाचशे खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याबाबतची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. नागरीकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

Related Stories

No stories found.