त्याच तिकिटीवर तोच खेळ किती दिवस खेळणार? : सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला 

भाजपचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची या संदर्भातील भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी.
त्याच तिकिटीवर तोच खेळ किती दिवस खेळणार? : सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला 
MLA Sunil Shelke's criticism on Bala Bhegade from Pavana pipeline

वडगाव मावळ (जि. पुणे) : मावळ तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी पवना जलवाहिनीबाबत त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी नाव न घेता एकेकाळचे सहकारी, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यावर केली आहे. 

आमदार शेळके यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील नऊ वर्षापासून स्थगित असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हालचाली सुरु झाल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध करताना 2011 मध्ये उभारण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तालुक्‍यातील अनेक शेतकरी जखमी झाले होते. 

त्या घटनेचे भावनिक राजकारण करून व आमचा पवना जलवाहिनी प्रकल्पास विरोध आहे, असे मावळमधील जनतेला भासविले जात आहे. दुसरीकडे, पवना जलवाहिनीचे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे पिंपरी-चिंचवडकरांना सांगून 2011 पासून पवना जलवाहिनीच्या नावाखाली मतांचे राजकारण केले जात आहे.

भाजपचा जर या प्रकल्पास विरोध होता, तर भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना हा प्रकल्प रद्द का करण्यात आला नाही ? असा सवाल आमदार शेळके यांनी भाजपच्या नेत्यांना केला आहे. 

पवना जलवाहिनी सोडून त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते पवना जलवाहिनी प्रकल्पाला पाठींबा देत आहेत, तर दुसरीकडे मावळमधील भाजपचे पुढारी त्यास विरोध करत आहेत. यावरुन भाजपची दुटपी भूमिका स्पष्ट होत आहे. 

भाजपचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची या संदर्भातील भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी. जर त्यांचाही जलवाहिनीस विरोध असेल तर आम्हीही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करु. भाजपची ही दुटप्पी भूमिका मावळच्या जनतेच्या लक्षात आली आहे. 

या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करत असताना भाजपने स्थानिक शेतकरी किंवा भूमिपुत्र जो निर्णय घेत असतील, त्याला पाठिंबा द्यावा. तुमच्या राजकारणामध्ये स्थानिक भूमिपुत्रांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, याचे भान ठेवावे.

स्थानिक शेतकरी व नागरिक यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घ्यावा. राजकीय व्यक्तींनी यापासून दूर राहावे, असे मतही आमदार शेळके यांनी व्यक्त केले आहे. 

Related Stories

No stories found.