कलानगर, वरळीच्या बाहेर मुंबई आहे की नाही?

या पैशांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल.
कलानगर, वरळीच्या बाहेर मुंबई आहे की नाही?
MLA Ashish Shelar criticizes ruling Shiv Sena

मुंबई : मुंबई महापालिकेतील कारभाऱ्यांच्या दृष्टीने मुंबईत केवळ दोनच भाग आहेत. एक कलानगर आणि दुसरा वरळी. जे प्रकल्प येतात ते या दोन भागातच. मग बाकीचे मुंबईकर काय सवतीचे आहेत का? असा सवाल करत भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. (MLA Ashish Shelar criticizes ruling Shiv Sena)

मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर मुंबई भाजपतर्फे पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या वेळी मुंबईतील विविध प्रश्नांवरून महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३० ते ३४ हजार कोटींचा असून सरासरी ३० हजार कोटी जरी वर्षांचे पकडले; तर पाच वर्षांत मुंबईत १ लाख ५० हजार कोटी रुपये खर्च झाले. मुंबईची लोकसंख्या सुमारे एक कोटी २० लाख असून श्रीमंत माणूस पालिकेकडे काही मागायला येतच नाही. त्यामुळे ७० लाख लोकांसाठी गेल्या पाच वर्षांत १ लाख ५० हजार कोटी रुपये खर्च झाले. कुठे गेला हा पैसा? ना रस्ते, ना पाणी, ना अन्य सुविधा. त्यामुळे या पैशांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल, असेही या वेळी आमदार शेलार म्हणाले.

माजी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. तसेच, झोपडपट्टी व चाळीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले. मुंबईतील नागरिक आर्थिक अडचणीत असतानासुद्धा राज्य सरकारने किंवा ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या व दर वर्षी १६०० कोटी रुपये केवळ व्याजापोटी उत्पन्न असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याने या मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
तौत्के वादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत देण्यात यावी. कोरोनामुळे पाणीपट्टी, अग्निशमन कर, रस्ते करामध्ये ५० टक्के सवलत द्यावी. तसेच, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यात यावा, अशा मागण्याही आशिष शेलार यांनी या वेळी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.