भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत सरपंचाचे सभासदत्व रद्द  - Membership of sarpanch gets cancelled | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत सरपंचाचे सभासदत्व रद्द 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021


भिवंडी तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी वर्षभराच्या विहित मुदतीत ग्रामसभा न घेतल्याने त्यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकरी वैदही रानडे यांनी नुकताच दिला. 

भिवंडी:  भिवंडी तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी वर्षभराच्या विहित मुदतीत ग्रामसभा न घेतल्याने त्यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकरी वैदही रानडे यांनी नुकताच दिला. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. देवराज कचेर नाईक असे कारवाई झालेल्या सरपंचांचे नाव आहे. कारीवली ग्रामपंचायतींच्या जानेवारी 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट मतदारातून सरपंच म्हणून देवराज नाईक हे विजयी झाले होते .

परंतु त्यांनी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या आर्थिक वर्षात ज्या चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, त्या घेतल्या नसल्यामुळे रामचंद्र मोतीराम पाटील, हनुमान शांताराम चौधरी, योगेश प्रकाश पाटील, विलास रामचंद्र जोशी, सुषमा दयानंद पाटील, पूनम मेघनाथ पाटील, राधा अभिमन्यू चौधरी, जमुना दशरथ नाईक या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन 17 मार्च 2020 रोजी सरपंच देवराज नाईक व ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले होते. त्या विरोधात देवराज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पुनर्सुनावणी घेण्याबाबतीत न्यायालयाने निकाल दिल्यावर पुन्हा एकदा अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन या अगोदर दिलेला निकाल कायम ठेवत मासिक सभा नियमित न घेणे, मासिक सभेचे झालेले कामकाज वेळेवर व वस्तुनिष्ठ स्वरूपात इतिवृत्त नोंदवहीत न नोंदविणे, शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 प्रमाणे ग्रामसभा आयोजित न करणे इ. कामे सरपंच यांनी कार्यकारी प्रमुख म्हणून करून घेणे आवश्यक होते.

तसेच  ग्रामविकास अधिकारी यांनी देखील त्यांचे कामकाजाचे कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याचे कारण देत व उच्च न्यायालयाने दिलेल्या नव्याने फेरचौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 (1) अन्वये सरपंच देवराज नाईक यांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करीत असल्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी दिला असून या बाबतची माहिती गटविकास अधिकारी यांना अंमलबजावणी करण्याबाबत कळविले आहे. दरम्यान ग्रामविकास अधिकारी हिरामण तरवारे यांच्यावर या पूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख