मंचर नगरपंचायत : ठाकरे सरकारची अधिसूचना अडकली निवडणूक आयोगाच्या कात्रीत
Manchar Nagar Panchayat notification issued; But it was not approved by the Election Commission

मंचर नगरपंचायत : ठाकरे सरकारची अधिसूचना अडकली निवडणूक आयोगाच्या कात्रीत

इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करावे, असा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने अजून मान्यता दिली नाही. याचबरोबर राज्यातील काही ग्रामपंचायती उच्च न्यायालयात गेल्या आहेत. उच्च न्यायालयात येत्या मंगळवारी (ता. 29 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. तांत्रिक पेच वाढल्याने व मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया अद्याप न थांबल्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. 

शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींकडून मंचर येथे नगरपंचायत करण्याबाबत गेल्या दोन महिन्येंपासून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मंचरला ग्रामपंचायत की नगरपंचायत असा संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, यांच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंचर नगरपंचायतीची मागणी केली होती. चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायतीची घोषणा शिंदे करणार असल्याचे शिवसेनेकडून त्यावेळी जाहीर केले होते. 

महाविकास आघाडीचे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते लक्ष्मण थोरात, संतोष गावडे, अल्लू इनामदार, जगदीश घिसे, राजेंद्र थोरात, जे. के. थोरात यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंचरला नगरपंचायत करावी, अशा मागणीचे निवेदन दिले होते. या नेत्यांनी नगरपंचायत होणारच असे पत्रक प्रसिद्धीस दिले होते. 

आंबेगाव तालुक्‍यातील वळसे-पाटील व आढळराव पाटील या दोन दिग्गज नेत्यांमुळे मंचर नगरपंचायत होणारच, असा आत्मविश्वास इच्छुक उमेदवार व नागरिकांमध्ये होता. नेत्यांनीही ही मंत्रालय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा केली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी नगरविकास खात्याचे पत्र जाईल. अशी व्यवस्थाही केली. पण, निवडणूक आयोगाने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यातच राज्यातील अन्य ग्रामपंचायतीचे काही लोक औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात सरपंचपद आरक्षणाच्या विषयी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत धाव घेतली आहे. त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. 

हा पेचप्रसंग पाहूनच जिल्हास्तरावरील निवडणूक आयोगाने मंचर ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांची पळापळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायतीची निवडणूक होणार, त्यासाठी अजून काही कालावधी मिळेल, असे गृहीत धरून अनेक उमेदवारांनी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव केली नव्हती. 

मंचर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारीपदी मंचर उपविभाग सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता विजय आघाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


राज्यपालांच्या आदेशानुसार नगर विकास खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांनी बुधवारी (ता. 23 डिसेंबर) अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मंचरच्या सीमा निश्‍चित केल्या आहेत. त्यावर येत्या ता.30 डिसेंबर पर्यंत हरकती मागविल्या आहेत. 

अनुसूची अ 
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र : मंचर सर्वे नं. 1 ते 173 ,मंचर सर्वे नं. 177 ,मंचर गावठाण खुद्द 174 ते 181,मोरडेवाडी सर्वे नं. 1 ते 81, गावठाण सिटी सर्वे नं. 1 ते 998 

अनुसूची ब 
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील ः उत्तर- एकलहरे शिव, उत्तर पूर्व- घोडनदी-चांडोली बुद्रुक, पूर्व- चांडोली खुर्द ,दक्षिण पूर्व- अवसरी खुर्द शिव, दक्षिण- शेवाळवाडी, दक्षिण पश्‍चिम- निघोटवाडी शिव, पश्‍चिम- निघोटवाडी शिव, पश्‍चिम उत्तर- सुलतानपूर शिव. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in