भाजप आमदाराच्या मुलाच्या रिसॉर्टवर पोलिसांची धडक कारवाई 
Lonavla Police action on BJP MLA's son's resort

भाजप आमदाराच्या मुलाच्या रिसॉर्टवर पोलिसांची धडक कारवाई 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक जण गुजरात येथील व्यापारी आहेत. याशिवाय 12 मुलींचाही समावेश आहे.

लोणावळा : पुणे-मुंबई महामार्गालगत लोणावळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुमार रिसॉर्टमध्ये सोमवारी (ता. 7) मध्यरात्री लोणावळा पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या साठ जणांसह 72 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक जण गुजरात येथील व्यापारी आहेत. याशिवाय 12 मुलींचाही समावेश आहे. 

दरम्यान, हा कुमार रिसॉर्ट भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी संबधित आहे. पोलिसांनी या प्रकरणी रिसॉर्टचे मालक व कुमार आयलानी यांचे पुत्र धीरजकुमार आयलानी, व्यवस्थापक अन्वर शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी छाप्यात 3 लाख 20 हजार 830 रोकड, 6 हजार 343 रुपयांचे मद्य व 37 लाख 4 हजार 170 रुपयांचे टोकन असा एकूण 40 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी व सहायक पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांना येथील कुमार रिसॉर्टमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जमलेले असून जुगार सुरू असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी खात्री करत सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कुमार रिसॉर्टमधील गेम झोनच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलवर छापा टाकला. त्यावेळी येथील सहा टेबलवर जुगार सुरु असल्याचे दिसून आले. 

काउंटरवर एक हजारचे 3537 तर, पाचशे रुपयांचे 682 टोकन आढळले. टेबलवर एक हजारचे 148, तर पाचशे रुपयांचे 148 टोकन आढळले. आयोजक झिशान इरफान इलेक्‍ट्रिकवाला (वय 34, रा. जोगेश्वरी पश्‍चिम, मुंबई) याच्यासह जुगार खेळणाऱ्या साठ जणांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी लेडीस सर्विसच्या माध्यमातून टेबलवर मद्य पुरवले जात असल्याचेही आढळून आल्याने 12 तरुणींनाही अटक करण्यात आली. 

सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी, फौजदार मृगदीप गायकवाड, कर्मचारी पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, शंकर धनगर, ईश्वर काळे, सागर धनवे, सतीश कुदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जुगार प्रतिबंधक कायदा, राज्य प्रतिबंधात्मक कायदा, कोविड आपत्ती कायद्याच्या आधारे संबधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार विकास दादासाहेब कदम यांनी फिर्याद दिली आहे. 

यापूर्वी याच ठिकाणी चिमुरडीवर अत्याचार 

ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला ते रिसॉर्ट भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी संबधित आहे. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी सात वर्षीय दिव्यांग चिमुरडीवर अत्याचार होत निर्दयी हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या उद्रेकानंतर हॉटेलची तोडफोड करण्यात आली होती. 

Related Stories

No stories found.