कोरोनाबाधिताचे नाव व्हायरल झाले आणि शिक्रापूरातील 180 जण हैराण झाले...

पुणे जिल्ह्यातील हे प्रकरण अनेकांना त्रासदायक ठरले आहे.
कोरोनाबाधिताचे नाव व्हायरल झाले आणि शिक्रापूरातील 180 जण हैराण झाले...
corona 11

शिक्रापूर : कोरोनाबाधित, त्याचे संपर्कातील संशयित, उपचार करणारे डॉक्टर अशा कुणाचेही नाव, पत्ता, ओळख आणि मोबाईल नंबर जाहीर करु नये, असे गृहमंत्रालयाने आदेश जारी करुनही शिक्रापूर (ता.शिरूर) येथील कोरोनाबाधित डॉक्टरशी संबंधित १४४ रुग्ण आणि संपूर्ण शिक्रापूरातील ४१ डॉक्टरांची यादी जाहिर झाल्याने हे सर्वच जण हैराण झाले आहेत. ही यादी अगदी नागपूरपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत पोहचल्याने यातील अनेकांना आंतरराज्य कॉल सुरू असून काही डॉक्टर आता थेट पोलिस मध्ये तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.  

शिक्रापूरातील रेडिओलॉजिस्ट कोरोनाबाधित झाल्याचे एनआयव्हीचे रिपोर्ट तीन दिवसांपूर्वी आल्यावर त्यांच्याशी संपर्कात आलेल्या १४४ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले. यातील ६९ जणांचे स्वॅब पुण्यात तपासणीसाठी पाठविले असताना या सर्व १४४ जणांच्या नाव, गाव, मोबाईल नंबरसह असलेकी एक्सेल शीट (यादी) थेट सोशल मिडीयात व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे याच संशयितांच्या अधिक माहितीच्या अनुषंगाने शिक्रापूरातील ४१ डॉक्टरांची यादीही आरोग्य विभागाने मागावून घेवून त्यांच्याकडील गेल्या आठ दिवसांतील ओपीडीची माहिती मागावून घेवून कोरोना लक्षण असलेल्यांबाबतची चौकशी केली.

या सर्व कोरोना दक्षता कारवाईचे दरम्यान वरील सर्व संशयित रुग्ण तसेच सर्व उपचार करणारे डॉक्टर यांची एक्सेल शीट प्रशासनाचे वतीने तयार करण्यात आली. मात्र ही यादी महसूल, आरोग्य, पोलिस आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनापर्यंत मर्यादित राहणे अपेक्षित असताना ती सुरवातीला शिक्रापूर व शिरुर तालुक्यातील सोशल मिडिया ग्रुपमध्ये व्हायरल झाली. पुढे या यादीचे व्हायरल स्पीड एवढे वाढले की, ते थेट राज्य आणि परराज्य असे झाले. त्याचा परिणाम असा झाला की, आता वरील सर्व १४४ जण आणि शिक्रापूरातील ४१ डॉक्टर यांना चौकशीचे एक सारखे फोन सुरू झाले आहेत. नसत्या चौकशा, काळजीचे सल्ले, उपदेश आणि तुमच्या पासून दूरच रहायल पाहिजे असे मेसेजही अनेकांना ही मंडळी सुनावू लागली आहेत. दरम्यान या सर्व व्हायरल ग्रुपची चौकशी सध्या शिक्रापूर पोलिस करीत असून वेळ पडल्यास काहींना ताब्यात घेण्याचे संकेतही पोलिसांनी बोलून दाखविले आहेत.  

तक्रार करा; गुन्हा दाखल करु
कोरोनाशी संबंधित काहीही माहिती, संशयित रुग्ण, त्यांचे नातेवाईक, त्यांची माहिती तसेच कुणाही डॉक्टरांबाबत काहीही माहिती व्हायरल केली असेल त्यांची चौकशी केली जाईल. याबाबत कुणाची तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा शिक्रापूर पोलिसांकडून देण्यात आला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.