कोरोना रोखण्यासाठी कॉंग्रेस मैदानात उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

कोरोनाचा स्फोट झाल्याने कॉंग्रेसने राज्यात कोरोनामुक्त गाव व वॉर्ड ही मोहीम सुरु केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी कॉंग्रेस मैदानात उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल
Kovid help and support centers in every district of the Congress .jpg

पिंपरी : कोरोनाचा स्फोट झाल्याने कॉंग्रेसने राज्यात कोरोनामुक्त गाव व वॉर्ड ही मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २४ तास कार्यरत राहणारी कोविड मदत व सहाय्य केंद्र रविवारी एकाचवेळी सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी तेथे मदतीसाठी फोनचा पाऊस पडला. सर्वाधिक फोन हे रेमडीसिविर इंजेक्शन आणि बेडसाठी आले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ही संकल्पना आहे. त्यांनीच ९ तारखेला ३६ जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून अशी केंद्रे सुरु करण्यास सांगितले होते. काल सायंकाळी त्यांनी या केद्रांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा घेतला. पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन झाले. येथे दिवसभरात बेड आणि रेमडीसीविरसाठीच फोन आल्याचे तेथील समन्वयक मयूर जयस्वाल आणि विशाल कसबे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. या केंद्राचा नंबर शहरभर (जिल्हा) व्हायरल करण्यात आला आहे. 

तेथून रुग्णाला बेड व रेमडेसीविर, प्लाझ्मा व  इतर औषधे प्रशासनाकडून मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे. खासगी रुग्णालयांनी दिलेल्या जास्तीच्या बिलातही मदत केली जाणार आहे. सथ्या राज्यभर रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिरेही या केंद्रामार्फत घेण्यात येणार आहेत. तसेच जनजागृतीही ही केंद्रे राज्यभर करणार आहेत. त्यांना अडचण आली, तर ती दूर करण्यासाठी पक्षाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात असे मुख्य केंद्र उघडण्यात आले असून तेथे विशेष आस्थापना तज्ज्ञ तैनात आहेत. डॉक्टर, एनजीओ व तांत्रिक सहाय्य करणारा चमूही आहे, अशी माहिती या मुख्य केंद्राचे समन्वयक नितीन पाटील यांनी दिली.

यामागील भूमिका मांडताना पटोले म्हणाले, कोरोना या जागतिक महामारीचा नवा स्ट्रेन अधिक भयावह असून त्यावर मात करायची असेल, तर ती लोकसहभागाशिवाय शक्य नाही. म्हणून सामाजिक दायित्व म्हणून हा उपक्रम आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड़ेट्टीवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकारातून पक्षाने सुरु केला आहे. पक्षाच्या सहा कार्याध्यक्षांकडे जिल्हानिहाय केद्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मयुर जयस्वाल (9922146302), चंद्रशेखर जाधव (7218851885), विशाल कसबे (9850281908), मकरध्वज यादव (9922815267), कुंदन कसबे (9112465899), जिफिन जॉनसन (9822433695), आणि गौरव चौधरी (9665004794) हे कॉंग्रेस पदाधिकारी पिंपरींच्या कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी दक्ष आहेत. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in