जयंत पाटलांनी शेजारधर्म पाळला : म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात

या योजनेसाठी (स्व.) आमदार भारत भालके हे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने विधानसभेत सातत्याने आवाज उठवत राहिले.
जयंत पाटलांनी शेजारधर्म पाळला : म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात
Jayant Patil kept his word; Water released from Mahisal scheme for Mangalvedha taluka

मंगळवेढा : पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलेला शब्द पाळत शेजारधर्म निभावला आहे. बहुचर्चित म्हैसाळ योजनेतून (Mahisal scheme) तब्बल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवेढा (Mangalvedha) वितरिका क्रमांक 2 च्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.  त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. (Jayant Patil kept his word; Water released from Mahisal scheme for Mangalvedha taluka) 

पुरात वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून दक्षिण भागातील गावांना देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूक प्रचारातदेखील त्यांनी सलगर बुद्रुक येथे प्रचार सभेत बोलताना शेजार धर्माविषयी सांगताना तुमच्या भागाची शिव आणि आमची शिव शेजारी शेजारी आहे, त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने विचार करणार आहे, असा शब्द प्रचार सभेत बोलताना दिला होता. त्यानुसार आज म्हैसाळ योजनेतून कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. 

दरम्यान, त्याच सभेत मंगळवेढा उत्तर सिंचन योजनेचे सर्वेक्षणदेखील करणार असल्याचे सांगितले होते. सर्वेक्षणाचे कामही सध्या मंगळवेढ्याच्या पश्चिम भागात सुरू आहे. विधानसभेच्या 1999 मधील निवडणुकीत म्हैसाळ पाणी योजनेचा प्रारंभ झाला. सहाव्या टप्प्यातून हे पाणी मंगळवेढा शिवारातील सहा हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी येण्याचे प्रस्तावित होते.

या योजनेसाठी (स्व.) आमदार भारत भालके हे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने विधानसभेत सातत्याने आवाज उठवत राहिले, त्यामुळे या योजनेच्या या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास 2 हजार पेक्षा अधिक कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे या कामाला गती मिळाली.

 
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये. अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतल्याने हे पाणी शिरनांदगी तलावात आले. सध्या वितरिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे हे पाणी सध्या कालव्यातून सोडण्यात आले आहे, त्यामुळे महमदाबाद, मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खुर्द, सलगर बुद्रूक, पौट, बावची या गावांतील 3860 हेक्टरपर्यंत हे पाणी चाचणीच्या निमित्ताने सोडण्यात आले, त्यामुळे भविष्यात या भागातील शेतीला  म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्याला अखेर म्हैसाळ योजनेसाठी (स्व.) आमदार भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्याचे व सराकरने तरतूद केलेल्या निधीमुळे या योजनेचे पाणी तालुक्याला मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.

पाण्यासाठी आमच्या भागातील अनेक पिढ्या गेल्या. पण प्रत्यक्षात पाण्याचे नाव नव्हते; परंतु या भागात पाण्यासाठी बहिष्कार व विविध मार्गाने उभा केलेल्या आंदोलनामुळे तसेच, (स्व.) आमदार भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमच्या शिवारात पाणी आल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले. -बसवराज पाटील, आंदोलक, मारोळी
 
गेली 21 वर्षांपासून रखडलेला पाणीप्रश्न (स्व.) भारतनानांच्या पाठपुराव्याने मार्गी लागल्याचे समाधान लाभले. या योजनेपासून वंचित असलेल्या इतर गावांनादेखील पाणी मिळवून देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा यापुढील काळात कायम राहील.  -भगिरथ भालके अध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखाना 
 
मंगळवेढा वितरिका क्रमांक 2 ची कामे पूर्ण झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे तालुक्यातील 9 गावांतील 3860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. -बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, म्हैसाळ पाणी योजना

Related Stories

No stories found.