शिवसेनेचे भाजप कार्यालयांना लक्ष्य करणे अत्यंत चुकीचे - अॅड. अभय आगरकर

भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड.अभयआगरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांचा स्वभाव पाहता ते प्रथमच असे काही बोलले अशातला भाग नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशाच पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे भाजप कार्यालयांना लक्ष्य करणे अत्यंत चुकीचे - अॅड. अभय आगरकर
abhay agarkar.jpg

अहमदनगर ः  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वातावरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनी टीका केली असून, शिवसेनेने यावरून भाजप कार्यालयांना लक्ष्य केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

या संदर्भात अ‍ॅड. आगरकर म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांचा स्वभाव पाहता ते प्रथमच असे काही बोलले अशातला भाग नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशाच पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही, असेही आगरकर म्हणाले.

हेही वाचा...

 मात्र हे सांगतानाच या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते राणे यांच्याबद्दल शब्द वापरत होते, ते देखील समर्थनीय नाही. मुळात हे भांडण भाजप आणि शिवसेना असे नव्हतेच. ते भांडण राणे आणि ठाकरे किंवा जास्तीत जास्त राणे आणि शिवसेना असे होते. भाजपनेही राणे यांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही. मात्र राणे यांचे कारण काढून भाजपला टारगेट करण्याचे काहीही कारण नव्हते. राणे यांच्या वक्तव्यानंतर नाशिक, पुणे आदीसह राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यालयाला लक्ष्य करण्यात आले. 

नगरध्येही पोलिसात राणे यांच्या विरोधात तक्रार देणे इथपर्यंत समजू शकते, मात्र त्यानंतर वाटवाकडी करून भाजप कार्यालयासोर येऊन घोषणाबाजी करणे, कोणती राजकीय मानसिकता समजायची?

हेही वाचा...

शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाट्टेल तसे बोलतात. भाजप नेत्यांच्या विरोधात नको त्या शब्दात गरळ ओकतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही अनेकदा अश्‍लाघ्य टीका करण्यात आल्या होत्या. अगदी लोकांना ज्ञानामृत पाजण्याचा आव आणणारे संपादकही शेलक्या शब्दात आपल्या भावना मांडत असतात. भाजप कार्यकर्त्यांनी ना कधी अकांडतांडव केले ना कधी मोडतोड केली. 

पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे घातक
गेल्या काही दिवसात राजकीय भाषा कशी घसरत चालली आहे, हे उभा महाराष्ट्र पहात आहे. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रासाठी हे घातकच आहे. मात्र वैयक्तिक भावनेतून होणारी टीका आणि त्यावर कारवाईच्या नावाखालीही वैयक्तिक सूड भावनेतून सत्तेचा होणारा दुरूपयोग हे देखील तेवढेच दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्र्यांना अशा प्रकारे वागणूक देण्याचा प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला आहे. 

ती दानत आता नाही
यापूर्वीही वैयक्तिक टीका करण्याचे प्रकार महाराष्ट्रात झाले आहेत. हिंदू ह्रदयसम्राट शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. मात्र खिलाडू पद्धतीने त्यावेळी प्रत्येक टीका स्वीकारण्याची दानत राजकारण्यांमध्ये होती. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीका खिलाडूपद्धतीनेच स्वीकारल्या. राजकारणात मतभेद असणे गृहित आहे, मात्र मनभेद कधीच नसायचे. आज मतभेदापेक्षा मनभेदाचाच प्रकार तीव्रपणे समोर येत आहे. त्यात भाजप कार्यालयावरील हल्ले ही संतापदायक घटना आहे. काचेच्या घरात राहणार्‍यांनी तरी याचे भान बाळगावे, असे अ‍ॅड. आगरकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in