आमदारपुत्राला अटक करावी लागली नाही, तर केली : कृष्णप्रकाश
Commissioner of Police Krishna Prakash .jpg

आमदारपुत्राला अटक करावी लागली नाही, तर केली : कृष्णप्रकाश

सत्ताधारी आमदारांच्याच कार्यालयात गोळीबार झाल्याने व त्यात त्यांनी आपल्याला ठार मारण्याचा दावा केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.

पिंपरी : कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार जो कोणी दोषी असतो, त्याच्याविरुद्ध कारवाई होते. तेच मी केले. असे सांगत सत्ताधारी असूनही  राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाविरुद्ध झालेल्या कारवाईमागील खुलासा पिंपरी चिंचवडचे (Pimpri-Chinchwad)आर्यनमॅन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या खास मुलाखतीत केला. तसेच आमदारपुत्र सिद्धार्थ याला अटक करावी लागली नाही, तर केली. असे सांगत ही कारवाई नाईलाजाने नाही, तर कायद्याने झाल्याचे त्यांनी सूचित केले. (Interview with Commissioner of Police Krishna Prakash) 

दरम्यान, आरोपी व फिर्यादी अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन सखोल व निष्पक्ष तपास केल्यानेच आमदार बनसोडेंच्या कार्यालयात यावर्षी १२ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी आमदारांच्या मुलाविरुद्ध केवळ गुन्हाच नोंद झाला, नाही तर त्यात त्याला अटकही झाल्याचे आयुक्तांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे. प्रथम आमदारांनीच आपल्या दिशेने गोळीबार झाल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणात त्यांचा मुलगाच दोषी असल्याचे आढळल्याने व त्यात त्याला नंतर अटकही झाल्याने या घटनेत मोठा ट्विस्ट आला. परिणामी त्याची राज्यभर चर्चा झाली होती.

सत्ताधारी आमदाराच्या मुलाची केस असल्याने ती बंदही करता आली असती वा झाली असती. मग तुम्ही हे नाजूक आणि राजकीय दबावाचे प्रकरण कसे हाताळलेत असे विचारले असता सर्वात तंदुरुस्त आयपीएस असलेले कृष्णप्रकाश यांनी कायद्यासमोर सगळे समान असतात, मग दोषी कोणीही का असेना. असे सांगत या प्रकरणी निष्पक्ष कारवाई झाल्याचेच सांगितले. कधीकधी आरोपीच पोलिस कारवाईपासून स्वताला वाचण्यासाठी बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, हे सांगताना त्यांनी ताजे उदाहरण दिले. 

पाच ऑगस्टला एका तरुणाचा पिंपरीत खून झाला. त्यात आरपीआयचा (आठवले गट) माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे हा हल्लेखोर होता. पण, या घटनेनंतर त्यानेच आपल्यावर अज्ञाताने खूनी हल्याचा बनाव केला. तशी तक्रार देत पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, सखोल व निष्पक्ष तपास केला असता त्यात हा बनाव करणाराच आरोपी निघाला. त्यामुळे तीन दिवसानंतर त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. असाच काही प्रकार आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात झालेल्या गोळीबारात झाला होता. 

सत्ताधारी आमदारांच्याच कार्यालयात गोळीबार झाल्याने व त्यात त्यांनी आपल्याला ठार मारण्याचा दावा केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र, गोळीबार करणारा शहरातील कचरा गोळा करणाऱ्या पालिकेच्या ठेकेदाराचा व्यवस्थापक तानाजी पवारच या घटनेत गंभीर जखमी झाल्याने आयुक्तांचे कान टवकारले. त्यांनी दोन्ही बाजूंनी तपास सुरु केला. जखमीची चौकशी केली असता आमदारपुत्राने एक दिवस अगोदर पवारच्या कार्यालयात जाऊन मोडतोड करीत तेथे खूनी हल्ला केला होता. नंतर त्याचे दुसऱ्या दिवशी अपहरण करून त्याला आमदारांच्या कार्यालयात आणण्यात आले. 

तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्यातून वाचण्यासाठी त्याने गोळीबार केला होता. मात्र, तो करणेही गुन्हा असल्याने त्याच्याविरुद्धही खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला गेला. तर, त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आमदारपूत्र सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांविरुद्धही खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठी आमदारांचे कार्यालय व लगतच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची आणि पुरेसा पुरावा मिळवण्याची खबरदारी घेण्याची हुशारी पोलिसांनी दाखवली होती. त्यानंतर सिद्धार्थ तीन आठवडे पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, शेवटी त्याला कोकणातून पकडून आणण्यात आले. ८ जुलैला त्याला जामीन झाला. 

त्यानंतर १० जुलै रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोळीबार झालेल्या कार्यालयात येऊन आमदार बनसोडेंची विचारपूस केली होती.  दरम्यान, आमदार बनसोडेंच्या मुलाविरुद्ध कारवाई न करण्याकरिता कुणाचे फोन आले होते हा अशा नाजूक व अडचणीत आणू शकणाऱा प्रश्न आतापर्यंत सविस्तरपणे बोलणाऱ्या आयुक्तांनी शायराना अंदाजात हुशारीने टोलवला. त्यावर थेट भाष्य करणे त्यांनी खूबीने टाळले. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.