रेल्वेचे खासगीकरण नाही; मात्र... - Indian Railways will never be privatised: Piyush Goyal | Politics Marathi News - Sarkarnama

रेल्वेचे खासगीकरण नाही; मात्र...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

रेल्वेत खासगी गुंतवणुकीचे स्वागत करायलाच पाहिजे: पीयुष गोयल 

नवी दिल्ली:  भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच नाही, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत मंगळवारी स्पष्ट केले. रेल्वे आपल्या भारत देशाची संपत्ती आहे आणि ती कायम भारत सरकारच्या ताब्यातच राहील. मात्र, रेल्वेत सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर खासगी गुंतवणुकीचे स्वागत करायलाच हवे, असे सूचक वक्तव्यही गोयल यांनी केले.  

 भाजप सत्तेत आल्यानंतर 2009-2014 दरम्यान सरासरी 45 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकार वेगाने काम करत आहे, असेही गोयल म्हणाले. गोयल पुढे बोलताना म्हणाले, भाजपवर विरोधकांकडून रेल्वेच्या खासगीकरणाचा आरोप केला जातो. परंतु, रस्त्यावर केवळ सरकारी गाड्याच धावल्या पाहिजेत, असे कधी विरोधकांकडून बोलले जात नाही. खासगी आणि सरकारी गाड्या जेवढ्या चालतील तेवढाच अर्थव्यवस्थेला फायदा होईल. त्यामुळेच रेल्वेतील खासगी गुंतवणुकीचे आपण सर्वांनीच स्वागत करायला हवे. त्यामुळे सेवांमध्ये सुधारणाच होईल, असेही ते म्हणाले. 

एक वर्षाच्या आत मालगाड्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून रेल्वेला नेहमीच दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खासगी क्षेत्र वाढल्याने देशातील उद्योगाला चालना मिळेल. रोजगाराच्या संधी वाढतील. सरकार आणि खासगी क्षेत्रांनी मिळून काम केल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. आम्ही 2030 साठी रेल्वेचा मास्टर प्लान तयार केला आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले. येत्या काही वर्षात रेल्वेचा संपूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख