पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड अडचणीत? पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा

पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड अडचणीत? पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा
Pooja Chavan, Sanjay Rathore .jpg

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chvan) आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालिन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदवला होता. मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात त्यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. (Important evidence in the hands of Pune police in Pooja Chavan's death case) 

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागलाल्याची माहिती आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झाले होते. या सर्व संभाषणांचे रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटे चालले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

पूजाचा मोबाइल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस मोबाइलमधील सर्व डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येच्या २४ तास आधीचे यवतमाळ येथील रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवले असून फॉरेन्सिकसाठी पाठवले असल्याची माहिती आहे. 
 

दरम्यान, पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन  उडी मारून  तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवड़ी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून पुढील तपासात कोणताही प्रगती झालेली नव्हती. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे उत्तर दिले जात होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. 

वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पूजाच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच, पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. पूजाचा आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचेही त्यांनी म्हटले होते.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.