असल्या धमक्यांना मी घाबरत नाही : किरीट सोमय्या

शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
असल्या धमक्यांना मी घाबरत नाही : किरीट सोमय्या
I am not afraid of threats of notice: Kirit Somaiya

कल्याण  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मंत्र्यांनी नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याणमध्ये सांगितले. तसेच, घोटाळ्यांचे प्रकरण शेवटपर्यंत तडीस नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (I am not afraid of threats of notice: Kirit Somaiya)

कल्याणमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज माजी खासदार किरीट सोमया यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘कोविड काळात कल्याण-डोंबिबली महापालिकामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. स्थानिक पातळीवर भाजपचे पदाधिकारी आणि तज्ज्ञ लोकांची समिती गठीत करून लवकरच काळी पत्रिका बनवत हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला जाईल.’ 

किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले आहे. त्यावरही सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनीच तशा सूचना सर्वांना दिल्या असून मला ६ नोटीस आल्या आहेत. मात्र, १०० कोटींची वसुली करणारेच १०० कोटींच्या नोटिसा पाठवत आहेत. मात्र, या धमक्यांना न घाबरता मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई पालिकेतही भ्रष्टाचार

कोविडच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई महापालिकेत इंजेक्शन खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. ही इंजेक्शन वाढीव दराने खरेदी करण्यात आली असून हा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली. तसेच, ठाकरे सरकारच भ्रष्टाचारी असताना अनधिकृत बांधकामांबाबत केडीएमसी आयुक्त यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत काय बोलणार, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in