विरोध करणारा भाजप पवना जलवाहिनीच्या बाजूने कसा? 

सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे.
विरोध करणारा भाजप पवना जलवाहिनीच्या बाजूने कसा? 
How is the opposing BJP on the side of Pavana pipeline

पिंपरी : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यास मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या जलवाहिनीविरोधात उभारण्यात आलेल्या आंदोलना वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला होता. गेल्या नऊ वर्षांपासून हे काम बंद आहे. 

आता हे काम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पास विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. महापालिकेच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या पातळीवर ही जलवाहिनी पूर्ण करण्याची हालचाल सुरू आहे. त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला आहे. विरोध करणारा भाजप पवना बंदिस्त जलवाहिनीच्या बाजूने कसा, असा प्रश्‍न मावळ तालुक्‍यातून विचारला जात आहे. 

पवना धरणातून निगडी प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपलाइनद्वारे हे पाणी आणण्यात येणार आहे. पवना प्रकल्पांतर्गत अठराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र, महापालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. प्रकल्पासाठी सातत्याने देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यापूर्वी केलेल्या कामाची 75 कोटींची बिले व अन्य दाव्यांची रक्कम द्यावी लागणार आहे. 

जलवाहिनी मार्गातील अतिक्रमणे, भूसंपादन कामांसाठी परवानग्या घेणे, पाठपुरावा करणे, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे, खर्चासाठी अर्थसंकल्प करणे, सरकारी स्तरावर पत्रव्यवहार, रेकॉर्ड ठेवणे, प्रकल्प सादरीकरण, ठेकेदाराच्या कामावर गुणनियंत्रण ठेवणे आदी कामांसाठी सल्लागाराची आवश्‍यकता आहे. प्रकल्प सल्लागार म्हणून युनिटी आय ई वर्ल्ड (युनिटी कन्सलटन्ट) यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. 

दरम्यान, पवना बंदिस्त जलवाहिनीस विरोध करून आंदोलन उभारण्यात आले होते, त्या वेळी राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची, तर पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. आंदोलन मोडीत काढण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पिंपरी आणि राज्यात विरोधात असलेल्या भाजपने त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात रान पेटवून बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध केला होता. तसेच, शिवसेनेने त्यावेळी भाजपला साथ दिली होती. 

भाजप बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात भूमिका बजावत होता. मात्र, राज्यात सत्तेवर आल्यावर गेल्या पाच वर्षांत भाजपने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर आता महापालिका ताब्यात आल्यानंतर मात्र भाजपने जलवाहिनीच्या बाजूने भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलल्यानंतर मात्र जलवाहिनीसंदर्भात शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून जलवाहिनीचे काम मार्गी लावण्याच्या भूमिकेत दिसत आहे. 

Related Stories

No stories found.