...म्हणून वसई-विरारची निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे याठिकाणची निवडणूक गेल्या सव्वा वर्षा पासून रखडली आहे.
...म्हणून वसई-विरारची निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न
Vasai-Virar .jpg

विरार : कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील पंढरपूर विधान सभेची पोटनिवडणूक होते. जिल्हा बँकांच्या व आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतात. मात्र, गेल्या सव्वा वर्षा पासून रखडलेली वसई विरार (Vasai-Virar) पालिकेची निवडणूक (Municipal elections) कधी? घेणार असा प्रश्न येथील नागरिक निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला आता विचारू लागले आहेत. कोरोनाची भीती फक्त वसई विरारलाच आहे का? कि याठिकाणची सत्ता महाविकास आघाडीला मिळणार नाही. म्हणून निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना करते अशी चर्चा मात्र येथे रंगू लागली आहे. 

वसई विरार महानगरपालिकेची मुदत 28 जून 2020 संपल्यानंतर याठिकाणची निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र, कोरोनामुळे याठिकाणची निवडणूक गेल्या सव्वा वर्षा पासून रखडली आहे. आता हि निवडणूक कधी लागेल हे अजून स्पष्ट होत नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने निवडणूक कधी लागणार हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. तर दुसऱ्या बाजूला पंढरपूर येथील पोटनिवडणूक असेल किंवा जिल्हा बँकेची निवडणूक मात्र पार पडत असताना वसई विरार पालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त मात्र निघत नाही. त्यात मार्च 2021 मध्ये ओबीसींच्या मुद्ययावरून जिल्हापरिषदेतील १५ जणांचे सदस्यत्व गेल्याने त्याठिकाणच्या पोट  निवडणुका अवघ्या सहा महिन्यात घेतल्या जात असताना पालिका निवडणुकीचा मुहूर्त मात्र सापडत नाही.

यात काही तरी काळे बरे आहे का? असा प्रश्न राजकीय निरीक्षकांनाही पडला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून पुढील वर्षी असलेल्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. परंतु वसई विरार मधील रद्द झालेल्या ओबीसी जागांमुळे आरक्षण आणि प्रभाग रचना बदलणार कि प्रभाग रचना कशी असणार. ओबीसींच्या जागा सर्वांसाठी खुल्या ठेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार का? यावर ना निवडणूक आयोग काही बोलतो ना राज्य सरकार काही संकेत देत आहे. काहीही असले तरी निवडणूक आयोगाला आता वसई विरार महापालिकेची निवडणूक घ्यावीच लागणार आहे. कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार जास्तीत जास्त सहा महिने किंवा एक वर्षच निवडणूक लांबीता येते. त्यामुळे निवडणूक आयोग कधी निवडणुका जाहीर करते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 
 
वसई- विरार महापालिका निवडणूक 2020 प्रभाग रचना सोडत 
 
या सोडतीत महापालिका क्षेत्रातील 115 प्रभागांपैकी 58 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या 5 प्रभागांपैकी 3 जागा, अनुसूचित जमाती साठी असलेल्या 5 प्रभागांपैकी 3 जागा व ओबीसीच्या 31 प्रभागातील 16 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर जनरलच्या 74 प्रभागांपैकी 36  प्रभाग महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
 
कोरोना कमी झाला असून न्यायालयाने ओबीसी आरक्षण काढून निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता वसई विरार महापालिकेची निवडणूक आयोगाने घ्यायला हवी शिवसेनेची त्या दृष्टीने तयारी सुरु आहे, असे शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी सांगितले. 
 
वसई विरार, नवी मुंबई येथील पालिकेचा कार्यकाल संपून वर्ष होऊन गेले. मात्र, येथील निवडणुका कोरोनाच्या नावाने लांबविल्या जात आहेत. त्याच वेळी पंढरपूरची विधानसभेची पोटनिवडणूक, किंवा ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक होऊ शकते. त्याला कोरोनाचा अडसर येत नाही. आता तर अवघ्या सहा महिन्या पूर्वी न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरून जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना बाद केले. त्या ठिकाणी 15 जागांसाठी पोट निवडणूक होऊ शकते तर वसई विरार पालिकेच्या निवडणुका का? घेतल्या जात नाहीत हे न समजणार आहे आता न्यायालयाने ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आयोगाने तातडीने येथील निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी बहुज विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी केली.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या निवडणुका घ्यायला हव्यात, भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. परंतु निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात हि आमच्या पक्षाची भूमिका आहे. असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजन नाईक यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in