'वरूण सरदेसाईंना सरकारी भाचा घोषित केला आहे का'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'वरूण सरदेसाईंना सरकारी भाचा घोषित केला आहे का'
shivsena vs mns.jpg

नवी मुंबई ः  राज्यात कोरोनाची साथ सुरू असताना युवासेनेकडून पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले जात आहेत. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच मुंबईसह राज्यातील पाच महापालिकांची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांचे मेळावे भरविले जात आहेत. 

चित्रे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व सरकारमधील इतर जबाबदार मंत्री वारंवार कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबाबत व राजकीय कार्यक्रमात, लग्न समारंभात गर्दी टाळण्याचे उपदेश, सल्ले देताना दिसून येत आहेत. पण सरकारमधल्या पक्षांचेच नेते जर या उपदेशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवणार असतील तर इतरांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार शासनाला उरतो का? तसंच याच सत्ताधारी पक्षातील जर नियम धाब्यावर बसवणार असतील तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तीची अपेक्षा सरकार कशी करू शकतं? ही बेशिस्ती महाराष्ट्राला परवडणारी आहे का?

युवासेनेचे पदाधिकारी मेळावे घेतले जात आहेत, त्यात शक्ती प्रदर्शनासाठी गर्दी जमवली जाते आहे. कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवून वरूण सरदेसाई मेळाव्यांचं बिनदिक्कत आयोजन करत आहेत. समाजमाध्यमांमार्फत त्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नियम मोडण्यास उद्युक्त केले जात आहे. आणि तरीही वरूण सरदेसाई ह्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? त्यांना शासकीय पाहुणा (State Guest ) ह्या धर्तीवर 'सरकारी भाचा' घोषित केले आहे का ?

मोकाट सुटलेल्या सरकारी भाच्यासाठी आमचे महत्त्वाचे ८ सवाल

तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो? मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी असताना कोणतेही शारीरिक अंतराचे नियम न पाळता 'सरकारी भाचा' कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो? सरकारी आदेशांचं उल्लंघन केले म्हणून वरुण सरदेसाई यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये? जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर असे मेळावे होणार असतील तर सरदेसाई यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? 

'जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार' आणि 'मी जबाबदार' असे म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार 'सरकारी भाच्या' वर इतकं मेहेरबान का? कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी तो व्यक्ती आपल्या नातेसंबंधांतला का असेना... मग वारंवार छत्रपती शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार 'बेशिस्त भाच्याचा बंदोबस्त कधी करणार?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा 'सरकारी भाचा' कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का? सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का? राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?

या प्रश्नांची उत्तरे मिळणार नसतील तर सरकार ह्या अंतर्गत बेबंदशाहीपुढे हतबल आहे किंवा काहींना झुकते माफ देत आहे असा निष्कर्ष काढून आम्ही ह्या बेशिस्त वर्तवणुकी विरोधात कायदेशीर ( न्यायालीन) लढाईसाठी सज्ज आहोत.

Related Stories

No stories found.