पालकमंत्री दत्तात्रेय भरणे चोर; पुढचे आंदोलन गोविंद बागेत

हे सर्व बारामतीवरून घडलंय.
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे चोर; पुढचे आंदोलन गोविंद बागेत
Guardian Minister Dattatreya bharane is a thief; next agitation in Govind Bagh : Khopse

पुणे : पुण्यातील सिंचन भवनमध्ये आज (ता. १० मे) झालेल्या बैठकीत सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी जे सांगितले आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. पालकमंत्री भरणे हे चोर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दरोडेखोर आहेत. आमचं (सोलापूरच्या हिश्याचं) पाणी चोरलंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली जात आहेत, त्यामुळे यापुढचं आंदोलन आम्ही गोविंद बागेत (Govind Bagh) करू, असा इशारा उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खोपसे (Atul Khopse) यांनी दिला आहे. (Guardian Minister Dattatreya bharane is a thief; next agitation in Govind Bagh : Atul Khopse)

पुणे जिल्ह्यातील इंदापूरला उजनी धरणातून (Ujani dam) पाच टीएमसी पाणी देण्यावरून सोलापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. त्याबाबत सोमवारी (ता. १० मे) पुण्यातील सिंचन भवनात सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर खोपसे बोलत होते. या वेळी दोन्ही बाजूंचे लोक मंत्र्यांसमोरच तावातावणे बोलत एकमेकांना भिडले. 

अतुल खोपसे म्हणाले ‘‘आजच्या बैठकीत दत्तामामा भरणे यांनी जे सांगितलं आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. मुळात उजनी धरणात सांडपाणी येतच नाही, असं पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणी अधिकारी आणि पोलिसांवर मोठा दबाव आहे. उजनी धरणाच्या पाण्यातील एक टीएमसीसुद्धा पाण्याचे वाटप करणे आता शक्य नाही. मात्र, हे सर्व बारामतीवरून घडलंय. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे चोर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत.’’

‘‘आमचं (सोलापूर जिल्ह्याच्या हिश्श्याचं) पाणी चोरलंय आणि आजच्या बैठकीत सगळी गोलमाल उत्तरं दिली गेली आहेत. दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर आणि सोलापूरच्या लोकांमध्ये भांडण लावलं आहे. त्यामुळे पुढील आंदोलन आता गोविंद बागेतच करू, असा इशाराच खोपसे यांनी या वेळी बोलताना दिला.


गारटकरांनी मांडली इंदापूरची बाजू

दरम्यान, याबाबत इंदापूरचे प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बाजू मांडली. त्या वेळी त्यांनी उजनीच्या पाण्यावरून गैरसमज निर्माण केला जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, उजनी धरणातून पाणी उचलून ते खडकवासला कालव्यात आणलं जाणार आहे. ही योजना तशी जुनीच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत ते जो उल्लेख करताय, ते अत्यंत चुकीचे आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, याचे भान बाळगले पाहिजे.

सोलापूरचे पाणी पळवलं जातंय, असा गैरसमज निर्माण केला जात आहे. मात्र, ते वास्तव नाही. काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर त्यात राजकारणच जास्त वाटत आहे. उशाशी आलेलं पाणी आम्ही वापरणार आहे. ते सोलापूरचं पाणी नाही. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला जादा प्रमाणात उचललं जात आहे, त्यामुळे इंदापूरचं पाणी कमी झालं आहे. पुण्यातील तेच सांडपाणी आम्ही मागतोय आणि ते सरकार द्यायला तयार आहे, असे गारटकर यांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in