राज्यपाल कोश्यारी ठाकरेंना हवा असलेला निर्णय घेईना! सरकारचे टेन्शन जाईना!!

ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागते. ही मुदत २७ मे रोजी संपते.
राज्यपाल कोश्यारी ठाकरेंना हवा असलेला निर्णय घेईना! सरकारचे टेन्शन जाईना!!
uddhav thakare shapthvishi

पुणे : राज्य सरकार कोरोनाशी लढाई देत असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील दुसरे संकट अद्याप संपलेले नाही. त्यांना कोणत्याही परिस्थिती 28 मेपर्यंत विधान परिषदेचे आमदार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपाल भगससिंह कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल नियुक्त कोट्यातून नियुक्तीसाठी मंत्रीमंडळाची शिफारसही पाठविण्यात आली आहे. मात्र राज्यपालांनी यावर आता वेगवेगळे पर्याय चाचपडण्यास सुरवात केली आहे. 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या बारा पैकी दहा जागा आठ जून रोजी रिकाम्या होत आहेत. त्यातील दोन जागा या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच रिक्त झाल्या होत्या. या दोन रिक्त जागांवर ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र या दोन जागांवर शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांची या आधीच शिफारस करण्यात आली होती. तेव्हा ती शिफारस राज्यपालांनी मान्य केली नव्हती. या जागा रिक्त होण्यास सहा महिने असताना नवीन सदस्य का नेमायचे, असा सवाल राज्यापालांनी विचारला होता. तोच सवाल आता राज्यपालांचा अजूनही कायम आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी राज्यपाल हे अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याच्या तयारीत आहेत.

ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागते. ही मुदत २७ मे रोजी संपते. त्यामुळे त्याच्या आत ठाकरे यांना सदस्य होणे आवश्यक आहे. मंत्रीमंडळाने शिफारस करुनही राज्यपाल याच मुद्यावर नाही म्हणू शकतात का? यासाठीही कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.

लॉकडाउन संपल्यानंतर निवडणूक होणार जाहीर
ठाकरे पुन्हा सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात का, याबाबत साशंकता आहे. कारण पंजाबमध्ये पूर्वी एका मुख्यमंत्र्यांनी असे केले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही राज्यघटनेची घोर प्रतारणा आहे असे म्हणून त्या मुख्यमंत्र्यास पदावरुन पायउतार व्हायला लावले होते. त्यामुळे राज्यपालांनी नकार दिला आणि २७ मेच्या आत दुसरी कोणतीही निवडणूक अपेक्षित नसल्याने ठाकरे यांना पायउतार व्हावे लागेल. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. दरम्यान, ३ मे नंतर लॉकडाऊन संपल्यावर निवडणूक जाहीर होऊ शकते. किमान १२ दिवसांचा कालावधी देऊन नव्याने निवडणूक घेता येऊ शकते, असे विधिमंडळ सचिवालयाचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.