रिपब्लिकन पक्षाचा माजी शहराध्यक्ष निकाळजेला खूनप्रकरणी अटक 

आता निकाळजे याची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाचा माजी शहराध्यक्ष निकाळजेला खूनप्रकरणी अटक 
Former Republican Pimpri city president Suresh Nikalje arrested in murder case

पिंपरी  ः रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचा माजी अध्यक्ष चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे याला खुनाच्या गुन्ह्यात पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (ता. १० ऑगस्ट) अटक केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या खुनानंतर निकाळजे याने आपल्यावरच अज्ञात आरोपींनी हल्ला केल्याचा बनाव केला होता. (Former Republican Pimpri city president Suresh Nikalje arrested in murder case)

मनोज राजू कसबे (वय २५, रा. मिलिंदनगर, पिंपरी) या तरुणाचा ५ तारखेला खून झाला होता. त्यात निकाळजे याच्यासह त्याचे साथीदार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणात निकाळजे याला आज अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे तपासाधिकारी बडेसाब नाईकवाडे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. काळ्या ऊर्फ सचिन निकाळजे (वय ४०) आणि शौकत समीर शेख (वय ३२, दोघेही रा. मिलिंदनगर, पिंपरी चिंचवड) यांना या गुन्ह्यात अगोदरच अटक झाली आहे. तर, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल अशी इतर आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोज कसबे याला ५ तारखेला आरोपींनी ‘तू वेडा आहेस,’ असे चिडवले होते. त्यावर ‘मी वेडा नाही,’ असे तो त्यांना सांगत होता. त्यानंतरही ते त्याला चिडवत राहिल्याने मनोज याने त्यांना काठीने मारले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी त्याला स्टंप, बांबू आणि लाथाबुक्यांनी मरेपर्यंत बेदम मारहाण केली होती. मात्र, आरोपींच्या दहशतीमुळे तीन दिवस यासंदर्भात कोणी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, मनोजची आई पुष्पा यांनी ८ तारखेला दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींना पोलिसांनी लगेच अटक केली होती, तर निकाळजेला आज पकडण्यात आले.

दरम्यान, सुरेश निकाळजे याला दोन वर्षांपूर्वी फक्त सहा महिन्यांसाठी शहराध्यक्ष करण्यात आले होते. मात्र, नंतर त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याला पदावरून काढण्यात आले होते, असे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. तसेच, अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून काही दिवसांतच ती पूर्ण होईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पोलिसांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केल्यामुळे आता निकाळजे याची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in