पंढरपूर-मंगळवेढ्याचे मतदान झाले अन् भेगडे कोरोना पॉझिटिव्ह

भेगडे १६ दिवसांपासून पंढरपूरात तळ ठोकून होते. ते तिकडे असताना इकडे त्यांच्या सख्या मावशींचे कोरोनाने निधन झाले.
पंढरपूर-मंगळवेढ्याचे मतदान झाले अन् भेगडे कोरोना पॉझिटिव्ह
Sanjal Bhedge .jpg

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण प्रचार करून मतदान झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे सोलापूर प्रभारी, माजी राज्यमंत्री आणि मावळचे संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना कोरोनाने शनिवारी (ता. १७) गाठले. मात्र, त्यांची प्रक्रुती ठणठणीत असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

भेगडे १६ दिवसांपासून पंढरपूरात तळ ठोकून होते. ते तिकडे असताना इकडे त्यांच्या सख्या मावशींचे कोरोनाने निधन झाले. गुढीपाडवा सण झाला. तरी, प्रभारी आणि प्रचाराची जबाबदारी असल्याने ते इकडे घरी आले नाही. शनिवारी मतदान सुरू झाले व ते घरी तळेगावला आले. सायंकाळी त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

त्यांच्या चालकाला प्रथम कोरोना झाला. म्हणून भेगडेंनी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. या दौर्यात त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक साजीद शेख यांनाही या साथीची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे ते सुद्धा ही चाचणी करणार आहेत. भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रचारादरम्यानच कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांच्या संपर्कात तेथे प्रचारासाठी गेलेले भाजपचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेश लांडगे यांना ही टेस्ट करुन घ्यावी लागली होती. पण, ती निगेटिव्ह आल्याने त्यांनी आपला प्रचार पूर्ण केला होता. महेश लांडगे यांना अगोदरच कोरोना होऊन गेला आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. शनिवारी सायंकाळी 7 वाजता निवडणुकीच्या रिंगणातील 19 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सुमारे 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.  विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत आज झालेल्या पोटनिवडणुकीत 3 टक्के मतदान कमी झाले आहे.

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेवर शनिवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील व अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी ही आपली शक्ती पणाला लावली होती. स्वाभिमानीचा फटका नेमका कोणाला बसणार, याविषयी आता चर्चा सुरू असली तरी सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.