महाळुंगे-बालेवाडी क्रीडासंकुलात पाचशे खाटांचे रुग्णालय 

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रुग्णांच्या सोयीसाठी पाचशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे.
महाळुंगे-बालेवाडी क्रीडासंकुलात पाचशे खाटांचे रुग्णालय 
Five hundred beds in Mahalunge-Balewadi sports complex

औंध ः पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रुग्णांच्या सोयीसाठी पाचशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे.

सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात सध्या पाचशे खाटांची सोय असली तरी परिस्थितीनुसार यात वाढ करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले. 

शहरातील इतर ठिकाणी रुग्णांसाठी खाटांची जागा कमी पडल्यानंतर येथे रुग्णांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. महापौरांसह पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणची पाहणी करून तयारीचा आढावाही घेतला होता. येथील बॅडमिंटन हॉलसह रुग्णांसाठी वसतिगृहाच्या तीन इमारती उपलब्ध झाल्या असून येथे प्रशासनाने पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. 

पुणे शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये, रुग्णांची योग्य सोय व्हावी, यासाठी ही पर्यायी व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांसाठी कृत्रिम प्राणवायूच्या टाक्‍या उपलब्ध आहेत, तसेच सफाई केलेले स्वच्छतागृह व दोन रुग्णांमधील योग्य अंतर ठेवून खाटांची रचना करण्यात आलेली आहे. 

पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आलेल्या महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात रुग्णांना अत्यावश्‍यक परिस्थितीत आवश्‍यक अशा रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे. 


रुग्णांनो, खर्चाची चिंता सोडा, बरे होण्याची काळजी करा 


पुणे ः कोरोना झालाय? उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल म्हटलं की पोटात गोळा येतोय? मग, खासगी हॉस्पिटलमध्ये जायचंय? पण, तिथल्या खर्चाची चिंता वाटतेय ना? तुम्ही आता कुठच्याच हॉस्पिटलमधल्या उपचार खर्चाची धास्ती घेऊ नका...कारण? कोरोना रुग्णांवरील उपाचाराचा सारा खर्च महापालिका करेल. 

खास तुमच्यासाठी महापालिकेनं तब्बल दहा कोटी रुपये राखून ठेवलेत. आणि हो, तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये तेही चांगले आणि वेळेत उपचार मिळावेत; म्हणून खासगी हॉस्पिटलशी करारही केलाय. ज्यामुळे तुम्हाला उपचारासाठी कुठे नकार मिळणार नाही. तेव्हा, रुग्णांनो तुम्ही बरे व्हा! कुठच्याही खर्चाचा घोर करू नका....महापालिकेच्या आधी राज्य सरकारची महात्मा फुले योजना आणि धर्मादाय आयुक्तालयाकडूनही तुम्हाला मदत मिळणार आहे. 

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांत रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपली. तेव्हा लगेचच महापालिकेने खासगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करीत, तेथील बेड राखून ठेवले. 

अगदी अतिदक्षता विभागातील खाटाही रुग्णांसाठी उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली. त्यासाठी आजघडीला विविध 13 रुग्णालयाशी करार करण्यात आला. मात्र, तेव्हा, प्रश्न उभा ठाकला तो, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च कोणी करायचा? त्यावर राज्य सरकारने महात्मा फुले योजना काढली, खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या गरजूचा सारा खर्च करण्याची सोय आहे. त्यापलीकडे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मदत देण्याची तयारी दाखवली.

यात पुणे महापालिकाही मागे राहिलेली नाही. महापालिका हद्दीतील रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल झाल्यास त्याला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खासगी हॉस्पिटलची नवी यंत्रणा उभी केली. तेथील रुग्णांचा खर्च पुढच्या तीन महिन्यांत देणार असल्याचे लेखी देत रुग्णांना प्राधान्य देण्याची सूचना केली. या रुग्णांवर उपचाराची कमतरता भासणार नाही; म्हणून आपल्याकडचे दहा कोटी रुपये राखून ठेवले. ते कमी पडल्यास आणखी तरतूद करण्यात येईल, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. 

प्रायव्हेट खोली घेतल्यास स्वतः बिल भरायचे 

अग्रवाल म्हणाल्या, ""खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा खर्च महापालिका, राज्य सरकार करेल. मात्र, या योजनांमधून गरजूंना लाभ मिळेल. परंत, या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट खोली घेतलेल्या आणि जे खरोखरी खर्च करू शकतात, अशा रुग्णांच्या कुटुंबीयांनी स्वत: बिल द्यायचे आहे. परंतु, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सर्व मदत केली जाईल. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खर्चाची चिंता करण्यापेक्षा बरे होण्यासाठी काळजी घ्यावी.''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in