मोहिते पाटलांची रणनीती यशस्वी झाली अन्‌ अकलूज ग्रामपंचायतीवर नगरपरिषदेचा बोर्ड झळकला

अकलूज ग्रामपंचायतीच्या इमारतीवर लागलेला नगरपरिषदेचा बोर्ड आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची पोचपावतीच आहे.
मोहिते पाटलांची रणनीती यशस्वी झाली अन्‌ अकलूज ग्रामपंचायतीवर नगरपरिषदेचा बोर्ड झळकला
Finally, board of Municipal Council was installed on the Akluj Gram Panchayat building

पुणे : एकीकडे आंदोलन-उपोषण, दुसरीकडे न्यायालयीन लढाई आणि तिसरीकडे मंत्री, नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत मोहिते पाटील यांनी अकलूज नगरपरिषदेची लढाई अखेर जिंकली. तब्बल ४३ दिवस चाललेले चक्री उपोषण आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची रणनीती यामुळे अकलूज नगरपरिषदेचा निर्णय झाला आणि अखेर अकलूज ग्रामपंचायतीच्या इमारतीवर नगरपरिषदेचा बोर्ड लागला. (Finally, board of Municipal Council was installed on the Akluj Gram Panchayat building)

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतसंदर्भात ता. ११ सप्टेंबर २०१९ रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची प्रश्न प्रलंबित होता. अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना हा निर्णय तीन आठवड्यांत घेण्याचे निर्देश कोर्टाने सरकारला दिले होते.

दरम्यानच्या काळात हा प्रश्न सहमतीने सुटावा, यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून विनंतीही केली होती. अखेर ता. ३ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने नगरपरिषदेची अधिसूचना काढली आणि अकलूज आणि नातेपुते गावांना न्याय मिळाला. 

दुसरीकडे, शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हा प्रश्न ताणून धरणे संयुक्तीक ठरणार नाही. अकलूज नगरपरिषदेचा निर्णय तातडीने घेण्याचे साकडे नगरविकास मंत्री शिंदे यांना घातले. शिंदे यांनीही तातडीने नगरपरिषदेचा अध्यादेश काढून तो शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हाती दिला. 

दरम्यान, अकलूजचे विद्यमान उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत या निर्णयाचे श्रेय अकलूज-माळेवाडी आणि नातेपुते येथील नागरिकांच्या ऐकीला दिले आहे. त्या पोस्टमध्ये मोहिते पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या 43 दिवसांपासून अकलूज-माळेवाडी व नातेपुते येथील सर्व नागरीक, सर्व संघटनांनी एकजुटीने अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी लढा उभा केला. साखळी उपोषणाच्या माध्यमातून एकत्र येत पुन्हा एकदा सर्वांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. त्याबद्दल सर्व अकलूज-माळेवाडी ग्रामस्थांचे मनापासून आभार. अकलूज ग्रामपंचायतीच्या इमारतीवर लागलेला नगरपरिषदेचा बोर्ड आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची पोचपावतीच आहे, असा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या लढाईचे कौतुक केले.

आजपर्यंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली अकलूज ग्रामपंचायतीने देशात नावलौकिक मिळवला आहे. नगरपरिषद झाल्यानंतरही गावच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवण्यासाठी सर्वजण तळमळीने अहोरात्र प्रयत्न करत राहतील, यात शंका नाही, असा विश्वास शिवतेजसिंह यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in