गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल 
Filed a complaint against Gopichand Padalkar in Pune

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 

पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे यांनी ही तक्रार केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनाही तांबे यांनी पत्र पाठविण्यात आले आहे.

राज्यात सध्या कोविड-19 ची साथ सुरू असून सर्व संघटना, पक्ष, संस्था या कोरोना नियंत्रित करण्यात गुंतले आहेत. असे असतानाही भारती जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जनक्षोभ उसळून समाजात तेढ निर्माण होईल, असे तांबे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

राज्यात सध्या साथरोग नियंत्रण कायदा लागू आहे. असे असतानाही समाजात जाणीवपूर्वक उद्रेक घडवायचा, पवार यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मुद्दाम डिवचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे तांबे यांनी केली आहे. 


बारामतीत गुन्हा दाखल 

बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अश्‍लाघ्य वक्तव्ये केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलिसांना आज निवदेन देण्यात आले. 

काल पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना पडळकर यांनी पवार यांच्याबाबत नको त्या भाषेत टिका केली. राज्यभर राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटले. त्यानंतर आज बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीचे निवेदन देण्यात आले त्यानंतर पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आमदार पडळकर यांच्या विरोधातली ही पहिलीच तक्रार आहे. 

काल धनगर आरक्षणाबाबत बोलताना पडळकर यांची जीभ घसरली होती. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो! असे प्रत्युत्तर मंत्री धनंजय मुंडे यांनी पडळकर यांना दिले होते. 

शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत ते शत्रू नाहीत. कोणत्याही जेष्ठ नेत्यांवर अशी टीका योग्य नाही. याबाबत मी पडळकरांशी बोललो आहे. भावनेच्या भरात त्यांनी हे विधान केल्याचं मान्य केलं आहे. त्याबद्दल ते लवकरच स्पष्टीकरण देणार आहेत, असे काल या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. 

Related Stories

No stories found.