Eknath Shinde यांच्या शेजारी बसताच राहुल शेवाळेंनी बाॅम्बगोळाच टाकला...

Eknath Shinde यांच्यासोबत शिवसेनेचे बारा खासदार
Mp Rahul Shewale Letter to Shivsena Chief Uddhav Thackeray News
Mp Rahul Shewale Letter to Shivsena Chief Uddhav Thackeray NewsSarkarnama

राहुल शेवाळे गौप्यस्फोट : एकनाथ शिंदे गटाच्या लोकसभेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर राजकीय बाॅम्बगोळा टाकला. भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्या वेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले होते, असा बाॅम्ब शेवाळे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांचे 20 जून रोजी बंड झाल्यानंतर ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हाही ठाकरे यांनी तयारी दाखवली होती. मात्र संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी त्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत शिवसेना खासदारांना पुन्हा निवडून यायचे असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे आम्ही अनेकदा सांगूनही तो निर्णय न झाल्याने आम्ही आता भाजपसोबत जाण्याचे ठरविले आहे. तसेच आम्ही एनडीएसोबतच आहोत. शिवसेना एनडीएतून अधिकृतरित्या बाहेर पडल्याचे पत्र नाही. तसेच यूपीएत प्रवेश केल्याचेही शिवसेनेकडे अधिकृत पत्र नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले. 

संजय राऊत यांचा मॅटिनी शो बंद झाला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. शिंदे गटाच्या नेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड होणे आणि भावना गवळी यांना प्रतोदपदी नेमणे याबाब कायदेशीर कारवायांमुळे झाल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर शिंदे यांनी असे कोण म्हणते, असा प्रतिसवाल केला. त्यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांचे नाव घेतले. त्यावर ज्या लोकांचे नाव तुम्ही घेतले त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचे गरज नाही, असे म्हणत शिंदे यांनी संजय राऊत हे रोज सकाळी येऊन काहीतरी बोलत होते. आता त्यांचा तो मॅटिनी शो बंद झाला आहे. पण तुम्हाला बातम्या हव्या असतात त्यामुळे तुम्ही (पत्रकार) राऊत यांच्या विधानांना महत्व देता, असेही शिंदे यांनी सांगितले. 

Eknath Shinde and MP Krupal Tumane
Eknath Shinde and MP Krupal TumaneSarkarnama

एकनाथ शिंदे यांची बारा खासदारांसह नवी दिल्लीत पत्रकार परिषद. शिवसेनेच्या बारा खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची शिंदे यांची माहिती.  शिवसेनेच्या बारा खासदारांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो. राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांच्या नावाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील 50 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका या बारा खासदारांनी घेतली आहे, असे शिंदे यांनी या वेळी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्याला या खासदारांनी साथ दिली आहे. शिवसेना आणि भाजप यांची निवडणूक पूर्व युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारला पूर्ण सहकार्य देऊ केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र आले तर विकास चांगला होऊ शकतो, असे या खासदारांना वाटत आहे.जे खासदार वीस ते बावीस लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतात अशा खासदारांनीही बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली आहे. त्यांनी आज तसे पत्र लोकसभा सभापतींना दिले आहे. महाराष्ट्रातील सामान्य जणांसाठी जे काही चांगल काम करता येईल त्यात आम्ही कुठे कमी पडणार नाही, अशी आमची भूमिका आहे. 

संजय राऊत यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यातून शिवसेनेचे वेदनाच मांडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाची मागणी केली. या भेटीच्या वेळी खासदार राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नियुक्ती करावी, असे बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेचे विद्यमान गटनेने विनायक राऊत आणि प्रतोद म्हणून राजन विचारे यांची हकालपट्टीच शिंदे गटाने केल्याचे दिसून येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in