भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला एकनाथ खडसे उपस्थित राहणार...पण? - eknath khadse will attend bjp working committee meeting on Thursday | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला एकनाथ खडसे उपस्थित राहणार...पण?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

खडसेंच्या हालचालींवर भाजपचे लक्ष!

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पण खडसे हे भाजपच्या गुरूवारी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा भाजपचे प्रवक्त माधव भांडारी यांनी केला आहे. त्यामुळे खडसेंच्या या उपस्थितीवरून काही अंदाज बांधता येतात का, यावर चर्चा सुरू आहे. 

खडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात आज मुंबईत भेट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पवार यांनी खडसेंची भेट माझ्या नियोजनात आज नव्हती, असे सांगितल्याने त्या भेटीची चर्चा थांबली. पवार हे गुरूवारी दिल्लीत आहेत आणि खडसे हे मुंबईत असतील. त्यामुळे आठ आॅक्टोबरला तरी त्यांची भेट होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खडसे यांच्या पक्षांतरासाठी काहींनी दहा आॅक्टोबर रोजी सकाळी दहाचा मुहूर्त शोधून काढला आहे. प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. खडसेंच्या या संभाव्य हालचालींबद्दल भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की भाजपला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे खडसे यांनी या स्थितीत भाजप सोडू नये. आता महाजन यांचे हे आवाहन खडसे मनावर घेणार का की गेल्या काही दिवसांची भाजप विरोधातील खदखद प्रत्यक्षात आणणार, यावर येत्या दोन-तीन दिवसांतच निकाल लागण्याची शक्यता आहे.

खडसे काल सहकुटुंब मुक्ताईनगर येथून मुंबईत दाखल झाले आहेत.आज ते शरद पवार यांची भेट घेण्याची  शक्यता आहे.या बाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''भाजपची उदया कार्यकारिणीची निवड बैठक आहे. त्यासाठी आपण मुंबईत आलो आहोत.''

का आहेत खडसे नाराज?

खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. याच पार्शवभूमीवर ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुंबईत जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्यावर खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला होता. आपल्यावरील अन्यायाबाबत चार वर्षांपासून घरातच धुणी धुतोय, पक्षातच नाराजी व्यक्त करतोय, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी रस्त्यावर उतरलो, असे खडसे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. 

माझ्यावर जे आरोप झाले, त्या कोणत्याही आरोपात जराही तथ्य आढळले, मी दोषी आढळलो तर आतापर्यंत केलेल्या आरोपांबाबत मी भ्रष्ट आहे, नालायक आहे, बदमाश आहे असे कबूल करत उभ्या महाराष्ट्राची हात जोडून माफी मागेन, असेही खडसे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख