महाराष्ट्र पोलिस दलात नाराजी; फडणवीसांनी सांगितलं कारण...

सरकार आपल्या सोयीची लोक आणत आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात नाराजी; फडणवीसांनी सांगितलं कारण...
Devendra Fadnavis .jpg

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गृह विभागाने 37 आयपीएस (IPS) अधिकार्‍यांसह 54 पोलिस उपायुक्त  किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि तब्बल 92 सहाय्यक आयुक्त (पोलिस उप अधीक्षक) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यात प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, नागपूर, धुळे, उस्मानाबाद आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलून तेथे नवीन अधिकारी देण्यात आले आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारव निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis criticizes the state government)  

फडणवीस मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, पोलिस विभागात काय चालले याचा विचार करायची गरज आहे. राज्य सरकारकडून पोलिस दलात हस्तक्षेप होत असल्यामुळे नाराजी आहे. बदल्यांमध्ये काय परिस्थिती झाली हे आपण बघितले. ज्या बदल्या झाल्या त्याबाबत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले की नियमबाह्य काम सुरू आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

सरकार आपल्या सोयीची लोक आणत आहेत. महत्त्वाचे अधिकारी बाजूला फेकले गेले आहेत. त्यामुळे पोलिस दलात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, असेही फडणवीस म्हणाले. अनेक चांगल्या अधिकाऱ्यांना डावल्यामुळे पोलिस दलात बेशिस्त पणा दिसून येतो. असेही फडणवीस म्हणाले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले होते की फडणवीसांना अधिकारी भेटले की आरोप करतात. त्यावर फडणवीस म्हणाले, मला अनेक IPS अधिकारी भेटतात. ते आरोप करायला भेटत नाहीत. अधिकारी मला भेटतात त्यावरुन त्यांच्या मनात आसूया असेल तर आत्मचिंतन करावे. महाराष्ट्रातील अधिकारी हे नेत्यांना भेटतात. आमचे अधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायचे. मी मुख्यमंत्री असताना अधिकाऱ्यांना कधी अडवले नाही. मालिकांनी हे थांबवले तरी ते थांवणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. 

साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पीडितेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, ही घटना मन सुन्न करणारी आहे. ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना घडत आहेत त्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती, पुणे, पालघर, नागपूरमधील घटना या भयानक आहेत. शक्ती कायद्या संदर्भात बैठक झाल्या आहेत. मात्र, आज जे कायदे आहेत ते वापरून फास्ट ट्रॅक कोर्ट नेमुन कारवाई करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीषांशी बोलून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.