अजितदादा पालक असलेल्या कारखाना अध्यक्षांचा राष्ट्रवादीच्या संचालकांनीच मागितला राजीनामा

त्यानंतर तुम्ही सांगाल; तो निर्णय मला मान्य असेल, असे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर आश्वासन दिले होते.
अजितदादा पालक असलेल्या कारखाना अध्यक्षांचा राष्ट्रवादीच्या संचालकांनीच मागितला राजीनामा
Demand for resignation of Bhagirath Bhalke, President of Vitthal Factory

पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकत्व स्वीकारलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये दुही निर्माण झाली आहे. शेतकरी, कामगार आणि ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देण्यात कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके हे अपयशी ठरल्याने कारखान्याच्या संचालकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू व ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी ही भगिरथ भालके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत या विषयाला तोंड फोडले आहे. (Demand for resignation of Bhagirath Bhalke, President of Vitthal Factory)

दरम्यान, विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावरुन पंढरपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर काय तोडगा काढतात, याकडेच पंढरपुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. या कारखान्यात 1997 मध्ये सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची आर्थिक शिस्त बिघडली. त्यानंतर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या 18 वर्षांच्या काळात कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत तर कारखाना आर्थिक डबघाईल आला. मागील दोन वर्षांपूर्वी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली.

आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंच्या हाती कारखान्याचा कारभारा दिला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत त्यांच्याकडूनही कारखान्याच्या कारभारात फारसी समाधानकारक प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही. मागील दोन वर्षांपूर्वी गाळपास आलेल्या उसाची एफआरपी आणि कामगारांचा 21 महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यातच ऊस वाहतूक ठेकेदारांचेही देणे थकीत राहिल्याने भालके यांच्याविषयी  शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एफआरपीची रक्कम मिळावी; म्हणून शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलनही केले. वारंवार मागणी करुनही एफआपीची थकीत रक्कम मिळत नसल्याने शेतकरीही आता हतबल झाले आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल साखर कारखान्याचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर करुन आगामी काळात शेतकऱ्यांची थकीत देणी देऊ, असे निवडणुक प्रचार काळात आश्वासन दिले होते. पोटनिवडणुक होवून तब्बल पाच महिने उलटून गेले आहेत. त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कारभारात लक्ष घातले नाही की शेतकऱ्यांच्या थकीत बिलासंदर्भात कुठलेही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांच्या भावनांचा कडेलोट झाल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली.

या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी आठ दिवसांत पैशाचे नियोजन करून शेतकऱ्यांची व कामगारांची थकीत देणी देतो, अन्यथा त्यानंतर तुम्ही सांगाल; तो निर्णय मला मान्य असेल, असे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर आश्वासन दिले होते. आठ दिवसांची मुदत संपून चार दिवस उटलून गेले आहेत त्यानंतरही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळाली नाही. त्यानंतर आता संचालकांनीच भगिरथ भालके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरु केली आहे. त्यातच आता कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी तर थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी सांगितले की, 2018-19 आणि 2019-20 या दोन गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे सुमारे 30 कोटी, कामगारांचे 16 कोटी व ऊस वाहतूक ठेकेदारांचे 7 कोटी असे मिळून सुमारे 55 ते 60 कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. थकीत रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाची 23 ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भालके यांनी आठ दिवसांत संपूर्ण थकीत रक्कम देतो, असे आश्वासन दिले होते. आठ दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यानंतरही त्यांनी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे भगिरथ भालके यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मार्ग मोकळा करावा.   

या बाबत कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.