भालके अध्यक्ष असलेल्या ‘विठ्ठल’वर प्रशासक नेमा : माजी संचालक आक्रमक

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आजची अवस्था पाहवत नाही.
भालके अध्यक्ष असलेल्या ‘विठ्ठल’वर प्रशासक नेमा : माजी संचालक आक्रमक
Demand for appointment of administrator at Vitthal Sugar Factory

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची एफआरपीची रक्कम थकीत आहे. कारखान्याच्या या परिस्थितीला सध्याचे संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करुन कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी केली आहे.  भोसले यांच्या या मागणीनंतर पुन्हा एकदा भालके गटाअंतर्गत असलेली खदखद समोर आली आहे. (Demand for appointment of administrator at Vitthal Sugar Factory)

दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल कारखान्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली होती. पण, निवडणूक होऊन बराच अवधी लोटल्यानंतरसुद्धा पवार यांनी या कारखान्याच्या देण्यासंदर्भात कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत पंढरपुरात नाराजीचा सूर आहे. तसेच, मागील एका बैठकीत भगीरथ भालके यांनी पंधरा दिवसांत पैसे दिले नाही तर अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही ते मौन बाळगून आहेत. 

मागील हंगामात गाळप केलेल्या उसाची एफआरपी, कामगारांचे वेतन यासह तोडणी वाहतूकदारांची देणी थकीत आहेत. अशातच या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर असतानाच कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या विषयी संचालक, कामगार आणि शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

मागील आठ दिवसांपूर्वी कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनाही कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राजीनामा देऊन पुढील मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता माजी संचालक शेखर भोसले यांनी थेट संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. भोसले यांच्या मागणीमुळे कारखान्याचे अध्यक्ष भालके यांच्याविषयी असलेली नाराजी उघडपणे व्यक्त केली जाऊ लागली आहे.

याबाबत भोसले म्हणाले की, राज्यात एक नंबर असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आजची अवस्था पाहवत नाही. मागील दहा वर्षांपासून कारखान्याचा कारभार करणारे अध्यक्ष आणि संचालकांच्या गैरकारभारामुळेच कारखाना आर्थिक संकटात आला आहे. परिणामी कारखान्याच्या सुमारे 28 हजार सभासदांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कामगारांना पगार नाही. वाहतूक तोडणी ठेकेदारांना अजूनही त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत. कारखाना चालवण्यास असमर्थ ठरलेले हे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आपण साखर आयुक्तांकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.