फोन टॅपिंगवरून जेव्हा अजित पवार 'संतापतात'... - DCm Ajit Pawar on Phone tapping, president Rule And officer transfer Racket And Anil Deshmukh Case | Politics Marathi News - Sarkarnama

फोन टॅपिंगवरून जेव्हा अजित पवार 'संतापतात'...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  गुरूवारी चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. परवानगी दिली तर फोन टॅपिंग होते, असे ते म्हणाले. यावरुन त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपला आमच्याकडे बहुमत आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली. 

रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकाऱ्यांचे, तसेच काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय, याचा माग आता सरकारकडून काढला जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अहवाल महाविकास आघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची दाट शक्यता आहे.

राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, आरोप केले तरी  विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे सांगत राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित आहे, असेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु, मला त्यांना सांगायचे आहे की महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असेही अजित पवार म्हणाले.

अधिकारी बदल्यांबाबत विचारले असता पवार म्हणाले, अधिकारी बदल्यांच्या रॅकेटवरुन विरोधी पक्ष आरोप करतो आहे. पण त्या बदल्या झाल्याच नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. ज्या बदल्या रश्मी शुक्ला यांनी सांगितल्या, त्या बदल्या झाल्याच नाहीत. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचे नाव येईल त्याची चौकशी केली जाईल, असे म्हणत रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत अजित पवार यांनी दिले. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मंत्री आणि नेत्यांशी चर्चा केली. विषय गंभीर आहे. राज्य प्रमुख निर्णय घेतील, आम्ही सर्व कॅबीनेट, नेते त्यांच्यासोबत आहोतच, असेही अजित पवार म्हणाले. शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का, यावर मी कसे काय बोलणार, असे म्हणत प्रतिक्रिया देण्याची टाळली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख