शिवसेनेवर टीका करणे, ही नारायण राणेंची रोजीरोटी : नीलम गोऱ्हे

राणेंनी फक्त एक महिना शिवसेनेवर टीका न करता गप्प बसून दाखवावे.
शिवसेनेवर टीका करणे, ही नारायण राणेंची रोजीरोटी : नीलम गोऱ्हे
Criticism of Shiv Sena is Narayan Rane's political inevitability : Neelam Gorhe

पिंपरी  ः शिवसेनेवर टीका केल्यानेच बातम्या येत असल्याने नारायण राणे ती करीत आहेत. आता, तर ती त्यांची राजकीय अपरिहार्यताच बनली आहे. त्यामुळे ती त्यांची रोजीरोटीच आहे की काय असाही प्रश्नही पडला आहे, असा प्रहार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी (ता. २३) पिंपरीत केला. राणेंनी फक्त एक महिना शिवसेनेवर टीका न करता गप्प बसून दाखवावे. मग, त्यांच्या बातम्या त्यांच्या कामाच्या जोरावर येतात का हेही दिसून येईल, असे आव्हान त्यांनी दिले. (Criticism of Shiv Sena is Narayan Rane's political inevitability : Neelam Gorhe)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस डॉ. गोऱ्हे यांनी भेट देऊन कोरोना माहामारीच्या काळात पालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली. तसेच, कोरोना कालावधीत सरकारने जाहीर केलेल्या माथाडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, एकल महिला, निराधार मुले यांच्याकरीता असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. कोरोना काळात केलेल्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्य सरकारच्या योजना पालिकेने लोकांपर्यंत पोचवणे भाग होते, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी राणेंवर प्रहार केला.

नीलम गोऱ्हे यांना मीच शिवसेनेत आणले, या राणेंच्या वक्तव्याचा डॉ. गोऱ्हेंनी समाचार घेतला. त्यावर खरं तर सत्यशोधन समितीच नियुक्त करायला हवी, असे त्या उपरोधाने म्हणाल्या. मला शिवसेनेत आणले, यात राणेंचा काय अदृश हात होता, हे मला माहित नाही, असा टोला त्यांनी लगावला. करून दाखवले (मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडून दाखवला) हा भाजपचे मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्यांचा दावाही त्यांनी खोडला. सोमय्यांनी नार्वेकरांचा बंगला पाडून दाखवला नाही, तर नार्वेकरांनीच तो स्वताहून पाडला, असे सांगत आता राणे यांनी आपला अनधिकृत बंगलाही असाच पाडून दाखवावा, असे दुसरे आव्हान त्यांनी केंद्रीय मंत्री राणेंना दिले. 

भाजपचे सत्ताधारी पिंपरी-चिंचवड पालिकेतील टक्केवारी नुकतीच उघडकीस आली. भाजपचे पदाधिकारी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती अॅड. नितीन लांडगे व चार पालिका कर्मचारी हे एका ठेकेदाच्या मंजूर निविदांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी सहा लाख रुपये लाच मागून त्यातील एक लाख १८ हजार रुपये घेताना गेल्या बुधवारी (ता. १८) महापालिकेतच पकडले गेले. त्यात खरं तर भाजपने राजीनामा घ्यायला हवा, असे सांगणाऱ्या गोऱ्हेंचा रोख हा नाव न घेतलेल्या अॅड. लांडगेंकडे होता.

Related Stories

No stories found.