युवक कॉग्रेस पदाधिकाऱ्यावर खंडणी, अपहरणाचा गुन्हा

अनेक गुन्हे दाखल होऊनही गणेशगायकवाड व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.
युवक कॉग्रेस पदाधिकाऱ्यावर खंडणी, अपहरणाचा गुन्हा
Sarkarnama Banner - 2021-07-31T133023.467.jpg

पिंपरीः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस आणि पुण्यातील उद्योगपती केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड,औध, पुणे) याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. खंडणी, अपहरणासह अवैध सावकारीचा नवा गुन्हा त्याच्याविरुद्ध आता पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.३०) दाखल झाला. 

पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही (चतुशृंगी पोलिस ठाणे) अनेक गुन्हे दाखल होऊनही गणेश व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. पुणे व पिंपरीत अमिताभ गुप्ता व कृष्णप्रकाश यांच्यासारखे डॅशिंग पोलिस आयुक्त असूनही गायकवाड पितापूत्र फरार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातून सत्ताधारी राजकीय पक्ष कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याने गणेश व त्याच्या  वडिलांनाही अटक होत नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने आपल्या युवक पदाधिकाऱ्याविरुद्ध एक गुन्हा दाखल होताच लगेचच त्याला निलंबित केले आहे. या पक्षाचा राष्ट्रीय युवक सरचिटणीस शैलेश मोहिते याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात हनीट्रॅपचा गुन्हा दाखल होताच त्याच्याविरुद्ध पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. मात्र, अशी कारवाई कॉंग्रेसने आपल्या युवक पदाधिकारी गणेशविरुद्ध एक नाही,तर अनेक ते ही गंभीर गुन्हे दाखल होऊनही अद्याप केली नसल्याने त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तो मिळून येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे तो, त्याचे कुटुंबिय व साथीदारांविरुद्ध एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत.

सांगवीच्या आजचा गुन्हा हा १३ सप्टेंबर २०१७ ते २२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान घडलेला आहे. मात्र, गायकवा़डांच्या दहशतीने या गुन्ह्यातील फिर्यादी महेश पोपट काटे (वय ३९, रा. पिंपळे सौदागर) गेले दीड वर्षे गप्प होते. मात्र, गायकवाडांविरुद्ध गुन्हे दाखल होणे सुरु होताच त्यांनीही धाडस करीत पोलिसांत धाव घेतल्याने अपहरण, खंडणीसह बेकायदेशीरपणे सावकारी केल्याचा गुन्हा गायकवाड पितापूत्र व त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध दाखल झाला. 

सांगवी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नोंद झालेला हा महिन्याभरातील दुसरा गुन्हा आहे. त्यात गायकवाडांचे साथीदार सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके यांनी महेश यांना त्यांच्या घरातून उचलून अॅड. चंद्रकात नाणेकर यांच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांना धमकावून कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्याव्दारे महेश यांची पिंपळे सौदागर येथील मालमत्ता गायकवाड़ांनी आपल्या नावावर करून घेतल्याचे समजते. मात्र, आरोपींना अटकच झाली नसल्याने त्यांच्या चौकशीअभावी नक्की कुठल्या कागदपत्रांवर सह्या घेऊन कुठली मालकी घेण्यात आली हे आता समजलेले नाही, असे तपासाधिकारी आणि सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितले.

गायकवाडविरुद्ध याच पोलिस ठाण्यावर गेल्या महिन्यात २४ तारखेला अगोदरचा दरोड्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक अजिंक्य काळभोर यांच्या पिंपळे निलख येथील साईटवर जाऊन गणेश, त्याचे वडिल व साथीदारांनी काम बंद पाडले. तसेच पुन्हा इकडे फिरकला, तर दहावेळा फायरिंग करेन,असे  धमकावले होते. तर, त्याअगोदर पिंपरी-चिंचवडमधीलच हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केल्याचा गुन्हा जून महिन्यातच १६ तारखेला नोंदविण्यात आलेला आहे. त्यात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विजय  कुलकर्णी यांची सूस (ता.मुळशी.जि.पुणे) येथील एक एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली गेली आहे.

पुण्यातील चतुशृंगी पोलिस ठाण्यातही गणेश व त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली. त्यात २२ जूनला गणेश व नानासाहेब आणि त्यांचे साथीदार तसेच नानासाहेबांची मुलगी सोनाली व जावई दिपक गवारे यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, खंडणी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला. त्यात सोनाली दांपत्याला अटक झाली, मात्र, गायकवाड पितापूत्र फरार राहिले. त्यात त्यांनी महेश काटे यांच्या मातोश्री पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ महिला महिला उषा काटे फिर्यादी आहेत. त्यांना व त्यांचा मुलगा महेश यांना पुण्यातील औंध येथील आपल्या घरी बोलावून गायकवाडांनी व त्यांच्या साथीदारांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 

काटे यांचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी मध्ये आलेल्या महेशला धमकावण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला होता. महेशने गायकवाड यांच्याकडून व्यवसायाकरिता व्याजाने पैसे घेतले होते. ते पूर्ण फेडूनही ८५ लाख रुपये बाकी असल्याचे सांगून त्यांची रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील साडेसात एकर जमिन धमकावून नानासाहेब यांच्या पत्नी नंदा यांच्या नावे करून घेण्यात आली होती. त्याबद्दल काटे यांनी चतुशृंगी पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी या मायलेकांचे अपहरण करून गायकवाड यांनी आपल्या औंध, पुणे येथील घरी आणून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 

पिंपळे सौदागर येथील जागाही त्यांनी आपल्या नावे करण्यासाठी काटे मायलेकांना त्यांनी धमकावले होते. चतुशृंगींच्या सदर दोन गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल तिन्ही गुन्ह्यातही गायकवाडांना दीड महिन्यानंतरही अटक झालेली नाही. गणेश हा २०१९ च्या विधानसभेला भाजपकडून इच्छूक होता. मात्र,तिकिट न मिळाल्याने त्याने गेल्या मे महिन्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला लगेचच प्रदेश युवकचा सरचिटणीस करण्यात आले. 

Related Stories

No stories found.