कोरोना योद्धा दांपत्याचे मंत्र्यांनी केले स्वागत 

पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेली अडीच महिने जीव धोक्‍यात घालून कोरोनायोद्धे म्हणून काम करणारे डॉ. महेश गुडे व डॉ. अलकनंदा रेड्डी-गुडे हे दांपत्य पुन्हा मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहे. मंचरमध्ये सोमवारी (ता. 8) त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
कोरोना योद्धा दांपत्याचे मंत्र्यांनी केले स्वागत 
Corona warrior couple welcomed by ministers

मंचर : पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेली अडीच महिने जीव धोक्‍यात घालून कोरोनायोद्धे म्हणून काम करणारे डॉ. महेश गुडे व डॉ. अलकनंदा रेड्डी-गुडे हे दांपत्य पुन्हा मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहे. मंचरमध्ये सोमवारी (ता. 8) त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. उत्स्फूर्तपणे झालेले स्वागत पाहून गुडे दांपत्य भारावून गेले. 

पुण्याहून मंचरला येत असताना अवसरी फाट्यावर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रथम या दांपत्याचे अभिनंदन केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, अजय घुले, डॉ. चंदाराणी पाटील, जगदीश घिसे, डॉ. वर्षाराणी गाडे, डॉ. गणेश पवार, डॉक्‍टर, परिचारिका यांनी गुडे दांपत्यावर पुष्पवृष्टी केली. 

या अनपेक्षित आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या स्वागतामुळे डॉ. गुडे दांपत्य भारावून गेले होते. डॉ. गुडे म्हणाले, ""मंचरकरनी दिलेले प्रेम, प्रोत्साहन आम्ही कधीही विसरणार नाही.'' 

डॉ अलकनंदा म्हणाल्या,""पती महेश व माझा जवळपास 500 पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संपर्क आला. रुग्णांवर प्रचंड मानसिक दडपण व भीतीचे सावट होते. कोरोनाची लागण झाली, म्हणजे आपले काही खरे नाही. अशी भावना असलेल्या रुग्णांना प्रथम धीर देण्याचे काम केले. औषध उपचाराबरोबर समुपदेशन हा महत्वाचा भाग होता. त्यानंतर रुग्णांचा आमच्याबरोबर मोकळेपणाने संवाद सुरु झाला. या पूर्वी बरे होऊन घरी पाठविलेल्या व्यक्तींची माहिती दिल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा व आधार मिळाला. परिणामतः त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली. स्वतःचा व इतरांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी पीपीई कीट वापरणे आवश्‍यक होते. पण, पीपीई किट वापरणे आमच्यासाठी अत्यंत क्‍लेशदायक होते. अनेकदा चष्म्याच्या आतून धुके यायचे. काहीच दिसायचे नाही, मास्क काढता येत नसल्याने काही तासांनी गुदमरल्यासारखे व्हायचे. पण जिद्द व आत्मविश्वास टिकून ठेवण्याचे काम केले.'' 

रेणापूर (जि. लातूर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. महेश गुडे आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 2002 पासून हे दांपत्य दाखल झाले आहे. मंचरला डॉ. महेश गुडे हे अस्थिरोग, तर अलकनंदा कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी कॉलरा, स्वाइन फ्लू, मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग इत्यादी आजारांचे नैसर्गिक मार्गक्रमण त्यांवरील उपचार व नियंत्रण करणे याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in