chief minister udhhav thackrey is out of mumbai second time in lock down circumstances | Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा मुंबईबाहेर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे काम दिवसेंदिवस वाढतच निघाले आहे. प्रशासकीय यंत्रणेसह मुख्यमंत्री ठाकरे यांनाही उसंत नाही.

पुणे: कोरोना महामारीच्या संकटामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत थांबूनच संपुर्ण परिस्थिती हाताळत आहेत. चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते काही तास अलिबागजवळ आले होते. आज आषाढी वारीच्या महापूजेसाठी ते दुसऱ्यांदा मुंबईबाहेर पडत आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तीन महिन्यातच राज्यात कोरोनाचे संकट आले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यात दोन रूग्ण आढळले. त्याचा परिणाम म्हणून विधीमंडळाचे अधिवेशन लगेचच गुंडाळण्यात आले. आरोग्य यंत्रणेची सज्जता करण्याबरोबरच प्रस्तावित लॉकड़ाऊनवर सरकारला काम करावे लागले.  मुख्यमंत्र्यांनी 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत होते. त्यांनी लोकप्रतिनिधी, तसेत विविध राजकीय, सामाजिक नेत्यांशी संवाद ठेवला होता. 

लॉकडाऊनच्या सुरवातीच्या टप्प्यात प्रार्दुभावाचा अंदाज येत नव्हता. त्यातच लोकांना मूळ गावी जाण्याची घाई होती. मुख्यत: परप्रांतिय लोकांना परत पाठवण्याचे आव्हान होते. केंद्र सरकारचे धोरण, तसेच संबंधित राज्यांचा समन्वय याकामी महत्वाचा होता. यातूनही सरकारने मार्ग काढत लाखो लोक परराज्यात पाठवले. त्यानंतर राज्यातील अडकलेले लोक आपापल्या जिल्ह्यात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. हे काम सुरू असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ आले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. ते पाहण्यासाठी काहीवेळ उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात आले होते. लगेचच परत जावून त्यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री दुसऱ्यांचा मुंबई बाहेर पडत आहेत. त्यांच्याहस्ते उद्या पहाटे पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मीणीची महापूजा होणार आहे. 

कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे काम दिवसेंदिवस वाढतच निघाले आहे. प्रशासकीय यंत्रणेसह मुख्यमंत्री ठाकरे यांनाही उसंत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला महाआघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी मुंबईबाहेर दौरे करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यभर दौरे करून परिस्थिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरवातीपासून पुण्यावर लक्ष ठवले आहे. त्यांनी नुकताच सातारा दौरा केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वादळाच्या पाहणीनंतर राज्यभर दौरे करत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात त्यांनी मुंबईतील सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता ते राज्यातील महत्वाच्या ठिकाणी भेटी देवून आढावा घेत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनेक ठिकणी भेटी देवून सरकारच्या चुकांवर बोट ठेवले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख