झारखंडला जायचंय?...चार हजार रुपये मोजा! 

मेडिकल सर्टिफिकेट आणि रोख पैसे द्या, असे म्हणून चालक एका ट्रकमध्ये अगदी शंभर परप्रांतीय भरतात आणि एका खेपेमधून लाखो रुपये उकळत आहेत.
झारखंडला जायचंय?...चार हजार रुपये मोजा! 
Cheating of Migrant Workers by Motorists

चाकण ः "झारखंड जाने का है भैय्या, चलो, चार हजार रुपय दे दो' असे ट्रकचालक राजा कामगारांना सांगत होता. मेडिकल सर्टिफिकेट आणि रोख पैसे द्या, असे म्हणून चालक बंद ट्रकमध्ये अगदी शंभर परप्रांतीय भरतात आणि एका खेपेमधून लाखो रुपये उकळत आहेत. चाकणमधून असे ट्रक दररोज ये-जा करत आहेत. 

चाकणजवळील खराबवाडी (ता. खेड) परिसरातून सात कंटेनर एका रात्री भरून गेले आहेत, असे एकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांना सांगितले. रात्रीच्या वेळी लोकांना बसवून नेले जाते. असे प्रकार वारंवार घडत असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी नाराजी व्यक्त केली. 

चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत परराज्यातील अनेक कंटेनर, ट्रक मालाची ने-आण करण्यासाठी येत आहेत. सध्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व बस महाराष्ट्रातून अद्याप सुरू झालेल्या नाहीत. लॉकडाउन अगोदरच हाताला काम नाही, त्यामुळे त्यांचे खाण्याचे वांदे होत आहेत. त्यातून हे परप्रांतीय कामगार, मजूर हतबल झाले आहेत. गावी जाऊन किमान जगता तरी येईल, या आशेवर हे कामगार, मजूर गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनांचा शोध घेत आहेत. त्यातून कंटेनर, ट्रक चालक, मालक यांना ही आयती संधी मिळत आहे. 

खराबवाडीजवळ सात कंटेनरमधून सातशे लोकांना नेण्यात आले आहे. प्रत्येकाकडून तीन हजार रुपये घेण्यात आले. चाकणमधून ट्रक जात आहेत. झारखंडला जाण्यासाठी एका कामगाराकडून चार हजार रुपये भाडे घेतले जात आहे. कोरोना संसर्गाच्या साथीत कमाईची एक संधी म्हणून कंटेनर व ट्रकचालक याकडे पाहत आहेत. पण कंटेनर, ट्रकमध्ये चुकीच्या पद्धतीने गर्दी करून बेकायदा कामगार, मजूर नेले जातात, याला आळा बसण्याची गरज आहे. कारण तपासणीविना एखादा कामगार गेल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कामगार, मजुरांची ही लूट आहे. खायला पैसे नसताना केवळ कोरोनाच्या भीतीमुळे गावाला जाण्यासाठी कामगार, मजुरांची ही धडपड सुरू आहे. असे कोणी कंटेनर, ट्रकमधून परप्रांतीय कामगारांना नेत असतील तर संबंधितांनी पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. 
-कल्याण पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण 
............................. 

परप्रांतीय कामगारांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रयत्न 

राजगुरुनगर : परतीच्या मार्गावर निघालेल्या परप्रांतीय कामगारांना, काही राज्यांच्या प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने महाराष्ट्राच्या सीमेवर गर्दी होत आहे. त्यामुळे उद्‌भवणाऱ्या अडचणींबाबत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 15 मे रोजी लोकसभा सचिवांशी मोबाईलवर चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली. 

परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी ही चर्चा केली. खेड तालुक्‍यातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या परप्रांतीयांना मूळ गावी जाण्याची इच्छा आहे, त्यांना परत पाठविण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या वेळी डॉ. कोल्हे यांनी काही कामगारांशी संवाद साधून अडीअडचणींची माहिती घेऊन त्यांना दिलासा दिला. परजिल्ह्यांतील कामगारांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळण्याची प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करू, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.